हवेहवेसे वाटणारे स्मार्ट होम...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:09 AM2018-12-08T00:09:36+5:302018-12-08T00:09:43+5:30
घर घेताना शाळा, कॉलेज, मार्केट, रेल्वे स्थानक इतकेच नव्हे, तर चांगले रुग्णालय परिसरात असावे, असा विचार सर्वसामान्यांकडून केला जातो.
- पद्मजा जांगडे
घर घेताना शाळा, कॉलेज, मार्केट, रेल्वे स्थानक इतकेच नव्हे, तर चांगले रुग्णालय परिसरात असावे, असा विचार सर्वसामान्यांकडून केला जातो. मात्र, हल्ली पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असल्याने आणि दिवसातील १० ते १२ तास घराबाहेर राहत असल्याने त्यांच्या घराबाबतच्या संकल्पना थोड्या बदलल्या आहेत. घर अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त, सुरक्षित आणि मोबाइल रेंजमध्ये असण्याला प्राधान्य दिले जात आहे. थोडक्यात काय, घर डेकोरेटिव्ह करण्याबरोबरच स्मार्ट, डिजिटलाइज्ड असण्यावर भर दिला जात आहे, त्यामुळे आता बिल्डर्सचाही लक्झरी सोसायट्या बनविण्याकडे कल वाढला आहे.
ल क्झरी सोसायट्यांमध्ये एकवेळ घराचा एरिया थोडा लहान असेल. मात्र, क्लब हाउस, स्विमिंग पूल, जीम, गार्डन आदी सुविधांबरोबरच आता सीसीटीव्ही, इंटरकॉम सेवा, आॅटो लिफ्ट, सेंटर डोअर, फायर अलार्म, स्मार्ट लॉक या अत्याधुनिक सुविधाही दिल्या जात आहेत. त्यासाठी खास अॅप तयार करण्यात येत आहेत.
रहिवासी संकुलांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रवेश केल्याने त्या परिसरात इंटरनेट सेवाही उत्तम असणे गरजेचे आहे. शिवाय रहिवाशांबरोबरच या सेवाही सुरक्षित राहणे आवश्यक आहेत. कारण केबल तुटणे, शॉर्टसर्किट, सिस्टम ब्लॉक होण्याचे प्रकार कधीही, कुठेही होऊ शकतात. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कंपन्यांकडून इंटरनेट स्पीड आणि सुरक्षेवर विशेष भर दिला जात आहे. मध्यंतरी एका प्रख्यात कन्स्ट्रक्शन कंपनीने गॅसगळती, फायर अलार्मसाठी रहिवाशांना सेंसर, स्वतंत्र डिव्हाइस उपलब्ध करून दिले आहे. तंत्रज्ञानाचे जसे फायदे, तसे तोटेही असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. मुंबईतील एका गृहसंकुलात सुरक्षेसाठी पासवर्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी बायोमॅट्रिक किंवा फेसरीडर नसल्याने रहिवाशांसाठी ते अडचणीचे ठरू लागले. कारण पासवर्ड मिळवून कोणीही आत प्रवेश करू शकतो, अशी भीती त्यांचा वाटू लागली आहे. त्यामुळे दर आठवड्याला पासवर्ड बदलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. अनेक संकुलांमध्ये लाइट्स, एसी, फॅनसाठी एक अॅप, म्युझिक सिस्टम, होम थिएटरसाठी दुसरे, सुरक्षेसाठी तिसरे, गॅस गळती/फायर अलार्मसाठी चौथे असे वेगवेगळे अॅप्स तयार करण्यात येत आहेत, यामुळे अत्याधुनिक सुविधा मिळत असल्या तरी अनेकदा रहिवाशांचा गोंधळही उडालेला दिसतो. राहणीमान उंचावण्यात टेक्नोलॉजीचा मोठा वाटा आहे. स्मार्ट सुविधांचा संबंध लक्झरी जीवनमानाशी जोडला जात असला तरी शेवटी सिस्टममध्ये कधीही बिघाड होऊ शकतो, याचा अनुभव वरळीतील एका महिलेला काही दिवसांपूर्वी आला. संकुलातील व्हिडीओ कॅमेरा अचानक हॅँग झाला, सिस्टम क्रॅश झाल्याने सेंसर बेल आणि स्मार्ट लॉकही काम करेनासे झाल्याने त्यांना तब्बल चार तास घराबाहेर राहावे लागते. शेवटी टेक्निशिअन आल्यावर हा बिघाड दुरुस्त झाला.
>स्मार्ट होमची संकल्पना भुरळ घालणारी असली तरी आपल्याकडे ती आता कुठे रुजू लागली आहे. मोठमोठ्या, उच्चभ्रू गृहसंकुलांमध्ये कन्स्ट्रक्शन कंपन्यांकडून या सुविधा पुरवल्या जातात. तर काही संकुलांमध्ये त्यासाठी एजंट नेमले जातात. इव्हेेंट मॅनेजमेंटप्रमाणे सोसासटी मॅनेजमेंटसाठीही आॅटोमोशन आणि संबंधित कंपन्यांना काँट्रॅक्ट दिले जातात आणि संकुलातील, घरातील सिस्टम कसे मेंटेन ठेवावे, अॅप्स कसे हाताळावे, याचे ट्रेनिंगही कंपन्यांकडून दिले जाते, त्यामुळे भविष्यात अशा स्मार्ट होमची मागणी वाढणार हे नक्की.