भांडी तांब्याची असो वा पितळी ; हा उपाय देईल नवी झळाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 04:57 PM2019-08-28T16:57:07+5:302019-08-28T17:09:44+5:30
पितळी किंवा तांब्याची भांडी अनेकदा बरेच दिवस बाजूला ठेवून काळवंडतात आणि त्यांची चमकही निघून जाते. अशावेळी एक घरगुती उपाय तुमच्या भांड्यांना नवा साज चढवू शकतो
Next
पुणे : सण, उत्सव म्हटले की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ती पूजा. मात्र पूजा करणे तेव्हाच सोपे होते जेव्हा आधी तयारी केली जाते. अन्यथा अक्षता कुठे, श्रीफल कुठे अशी धावपळ होते. पण आगामी गणेशोत्सवात तुम्ही जर आधीच तयारी करून ठेवलीत तर अशी अडचण येणारच नाही. त्याकरिता आम्ही देत आहोत काही खास टिप्स.
यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पितळी किंवा तांब्याची भांडी. अनेकदा बरेच दिवस बाजूला ठेवून ती काळवंडतात आणि त्यांची चमकही निघून जाते. अशावेळी एक घरगुती उपाय तुमच्या भांड्यांना नवा साज चढवू शकतो.
साहित्य :
- मोठा कुकर
- टोमॅटो १ किलो (पूर्ण पिकलेले)
- पाणी
- पूजेची सर्व भांडी (निरंजन, समई,चमचे, गडवा {लोटी } )
कृती :
- साधारण एक किलो टोमॅटोचे प्रत्येकी चार भाग करून घ्या.
- आता कुकरमध्ये टोमॅटो घालून भांडी घाला
- या कुकरमध्ये भांडी बुडतील एवढे पाणी घाला आणि झाकण लावून घ्या.
- आता कुकरच्या चार शिट्ट्या घ्या आणि कुकर थंड होऊ द्या.
- आता भांडी बाहेर काढून पुसून घ्या.
- टोमॅटोमुळे भांडी चमकदार आणि चकचकीत दिसतील.
- मोठा कुकर नसेल तर एखाद्या जाड बूड असलेल्या पातेल्यातही हे करता येईल मात्र त्यासाठी अर्धा तास झाकण ठेऊन टोमॅटोच्या पाण्यात भांडी ठेवा.