Valentines Day: फार खर्च न करता 1 हजार रूपयात या स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करा व्हेलेंटाइन्स डे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 01:03 PM2018-02-13T13:03:05+5:302018-02-13T13:03:46+5:30
आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी अफाट खर्च करून अनेक जण या दिवसाचं प्लॅनिग करतात.
मुंबई- व्हेलेंटाइन्स डेकडे नेहमी महागडे गिफ्ट्स व अफाट खर्च करून आखलेल्या डेट्सच्या स्वरूपात पाहिलं जातं. आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी अफाट खर्च करून अनेक जण या दिवसाचं प्लॅनिग करतात. पण अती खर्च न करता कमी पैशातही व्हेलेंटाइन्स डे साजरा केला जाऊ शकतो. तुम्हाला व तुमच्या जोडीदाराला काय आवडतं याचा अंदाज घेऊन प्लॅनिंग करायचं आहे. ज्यामुळे तुमचा खर्चही कमी होईल व तुम्हाला एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळही घालविता येईल.
1. तुम्ही तुमच्या जोडीदाराला मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला न घेऊन जाता एखाद्या स्थानिक सिनेमागृहात सिनेमा बघायला घेऊन जाऊ शकता.किंवा नाटक पाहायला घेऊन जाऊ शकता. साध्या सिनेमागृहात तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे कमी खर्चात होणारी ही गोष्ट आहे. काहीतरी हटके करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला वडा-पावच्या गाडीवर नेऊन वडा-पाव खाऊ शकता. एक गुलाबाचं फुल द्या. एखाद्या मीडिया स्ट्रिमिंग वेबसाइटचं सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही रोमॅण्टिक सीरीज पाहू शकता. यामुळे एखाद्या ठिकाणाहून निघाल्यानंतर आता पुढे काय करायचं? असा प्रश्न जोडीदाराला पडणार नाही.
2. व्हेलेंटाइन्स डेच्या दिवशी अनेकदा बागेत जोडपी बसलेली पाहायला मिळतात. बागेमध्ये तुमच्या जोडीदाराबरोबर पिकनिक करणं हा सगळ्यात चांगला पर्याय असू शकतो. सॅण्डविच व ज्युस विकत घेऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बागेत बसू शकता. एक चटई किंवा चादर बरोबर घेऊन ती बागेतील गवतावर हंथरून तुम्ही दोघं बसून मस्त गप्पा मारू शकता. जर तुम्हाला व तुमच्या प्रियकराला लिहिण्याची, चित्र काढण्याची आवड असेल तर तुम्ही रंग व कागदं घेऊनही जाऊ शकता. जोडीदाराबरोबर लिखाण करून किंवा चित्र काढून तुम्हाला तुमचा छंदाही जोपासता येईल.
3. वाचनाची व लिखाणाची आवड असणाऱ्या जोडप्याला त्यांची आवड जोपासत प्रेमाचा दिवस साजरा करता येईल. चौपाटीवर बसून वाचन करणं, एखादी रोमॅण्टिक कविता किंवा कथा तुमच्या जोडीदाराला वाचून दाखवून तुम्ही एकत्र वेळ घालवू शकता. खाण्यासाठी तुम्ही चौपाटीवर मिळणाऱ्या पाणीपुरी-शेवपुरी सारख्या पदार्थांची निवड करू शकता.
4. तुमचा जोडीदाराला जर खाण्याची फार आवड असेल तर तुम्ही मस्त कबाब खायला जाण्याचा विचार करू शकता. एखाद्या स्टॉलवर जाऊन तुम्ही कबाब खाण्याची मजा घेऊ शकता. त्यानंतर लाँग ड्राइव्हवर जाऊन दिवसाचा शेवट आइस्क्रीम खाऊन करा.
अशा प्रकारे बजेटमध्ये तुम्ही व्हेलेंटाइन्स डे खास करू शकता.