कसलं संशोधन आणि कसल्या पिएचड्या?
By admin | Published: April 12, 2017 02:14 PM2017-04-12T14:14:05+5:302017-04-12T14:14:05+5:30
विद्यापिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामध्ये संशोधन चालतं का? खरंच आपण संशोधन करतो का? का नुस्ताच बाजार मांडलाय या संशोधन शब्दाचा.
- प्रा. महेश मधुकरराव जानोळकर, अमरावती
विद्यापिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामध्ये संशोधन चालतं का? खरंच आपण संशोधन करतो का? का नुस्ताच बाजार मांडलाय या संशोधन शब्दाचा.
आजकाल प्रत्येक विद्यापीठातून शेकडो विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक पीएचडी/ डॉक्टरेट पदवी घेऊन बाहेर पडतात. पण खरंच ते संशोधन करतात का? त्यांचे मार्गदर्शक यांचे अॅप्लिकेशन कुठे आहे याचा पाठपुरावा करतात का? किंवा या संशोधनाचे अॅप्लिकेशन कुठे आढळून येते का? तर याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल, कमीतकमी विद्यापीठातील संशोधनासाठी तरी नाही हेच उत्तर योग्य!
कारण प्राध्यापक हा संशोधन/पीएचडी हे फक्त इन्क्रिमेण्ट आणि प्रमोशन साठीच करतो, त्याचा मुळ पेशा शिकवणे/आहे हे मात्र काहीजण विसरतात. संशोधनापुढे टीचिंग हे शून्य असेच विद्यापीठ मानते, त्यावरच प्राध्यापकाचे महत्त्व विद्यापीठ ठरवते. मग प्राध्यापक तरी काय करणार, तेही लागतात संशोधनाच्या मागे.
इंग्रजीमध्ये संशोधन म्हणजे रिसर्च. ते होतं का?
पेड जर्नलला पाठवणे,ते पेपर म्हणून छापून आणणे, बस्स झाले तुमचे संशोधन. प्राध्यापकाच्या नावामागे पेपर वाढणार अन् विद्यापीठ पण त्या पेपरचे पॉइंट्स देणार, पुढे जाऊन हेच पॉइंट्स प्रमोशनसाठी उपयोगात येणार. मग काय याचप्रकारे चालतं हे संशोधन. याच संशोधनाला वापरून अजुन कुणीतरी दोन-चार पेपर पब्लिश करणार. प्रथम संशोधन करणाऱ्याची महती वाढणार. मग काय झाला ना तो फेमस.
मग काय गूगलवर त्याच्या पेपरचे रिव्ह्यूज अन सिटीशन वाढणार, मग इन्क्रीमेंट अन प्रमोशन. खरे पाहिले तर त्या संशोधनाचा ना कुठल्या खऱ्या संशोधनासाठी उपयोग ना समाजासाठी उपयोग, फक्त पेपर चा काउंट वाढणार. यामुळे खरा शिक्षक/प्राध्यापक हा शिकवण्यापासून कुठे तरी दूर जाणार.
सगळेच असं करतात असं नाही, काही सन्माननीय अपवाद आहेतच. पण संशोधन अशा रितीनं करणाऱ्यांचं प्रमाण मात्र वाढतं आहे.