नाईटशिफ्ट करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे, कामाच्या अनियमित वेळामुळे होऊ शकतो हृदयरोग व कॅन्सर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 02:27 PM2018-07-11T14:27:36+5:302018-07-11T14:30:05+5:30
ज्यांच्या शिफ्टस सतत बदलतात त्यांनी याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे.
नवी दिल्ली- भारतासह जगभरातील विविध देशांतील तज्ज्ञांनी नाइटशिफ्टमुळे लठ्ठपणा, मधुमेह वाढण्याचा धोका जास्त असतो आणि त्यामुळे कर्करोग, हृदयरोग होण्याचा धोका वाढतो असे निरीक्षण नोंदवले आहे. आपल्या सर्व शरीरासाठीचे नियंत्रण करणारे एकच बॉडी क्लॉक मेंदूमध्ये असते असा आजवरचा समज आहे. मात्र वॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या समजाला छेद जाईल असा अभ्यास केला आहे. त्यांच्यामते यकृत, स्वादुपिंड अशा अवयवांचं स्वतःचं असं वेगळं क्लॉक असतं.
या विद्यापिठातील हॅन्स वॅन डोंजेन याबाबत बोलताना म्हणाले, लोकांच्या पोटातील पचनक्रिया करणाऱ्या अवयवांच्या घड्याळाबाबत कोणालाच नीट माहिती नाही. कामाच्या पाळ्यांमध्ये अचानक होणारे बदल मेंदूलाही स्वीकारणं कठिण जात असतं. त्यामुळे शरीरातील काही अवयव आता दिवस आहे असा संकेत देत असतात तर काही अवयव आता रात्र आहे असा दुसरा वेगळा संकेत देत राहातात. त्यामुळे चयापचयावर परिणाम होतो.
कामाच्या वेळांमध्ये होणारा बदल तसेच मूत्रपिंडाचे आजार यांच्यामधील संबंध स्पष्ट करणारा आमचा हा पहिलाच अभ्यास असावा. असं या विद्यापिठातील शोभन गड्डेमिढी हे प्राध्यापक म्हणतात. या अभ्यासामध्ये शिफ्टमध्ये काम करणाऱे लोक मूत्रपिंडाचा कर्करोग, त्वचेचा व प्रोस्टेटग्रंथीचा कर्करोग होण्याची शक्यता असते. पेशींसंबंधी प्रक्रीयेचा चयापचयाशी संबंध असतो. त्यामुळे चयापचय बिघडलेल्या शिफ्ट कामगारांना पुढील काळामध्ये कर्करोगाचा धोका असतो असे गड्डेमढी म्हणाले. जर त्या पेशीसंबंधी प्रक्रीयेला समजून घेता आले तर त्यात समाविष्ट जीन्सना शोधता येईल व त्याचा उपयोग कर्करोग थांबविण्यासाठी उपचारात करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.