फटाका फॅक्टरी स्फोट; ११ जण ठार झाल्यानंतर २ मालक गेले तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:51 AM2024-02-08T06:51:08+5:302024-02-08T06:51:37+5:30
१०० हून अधिक जण रुग्णालयात, २ बेपत्ता
हरदा (मध्य प्रदेश) : शहरातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी बचावकार्य पूर्ण झाले. वेगवेगळ्या रुग्णालयात १०० हून अधिक जण अजूनही उपचार घेत आहेत तर दोन जण बेपत्ता होते. याप्रकरणी फटाका कारखान्याचे मालक राजेश अग्रवाल आणि सोमेश अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात संबंधितांवर अशी कारवाई होईल की लोक लक्षात ठेवतील, असे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे.
अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टर मदत घ्यावी लागली. स्फोटाचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी लोकांनी चक्काजाम आंदोलन केले. कारखान्याचे मालक राजेश अग्रवाल आणि सोमेश अग्रवाल यांना राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथून अटक करण्यात आली, तर रफिक खान नावाच्या आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर इतर आरोपांबरोबरच सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान हा या कारखान्याचा व्यवस्थापक असल्याचे सांगण्यात येत आहे.
२६
तास बचावकार्य सुरू होते
११
ठार
१८४
लोकांना बाहेर काढले
२१७
जण जखमी
५१
कामगारांचा जखमींमध्ये समावेश
असे घडणारच होते...
“अशी शोकांतिका तर घडणारच होती. असा फटाक्यांचा कारखाना निवासी भागात चालवला जाऊ नये. या सर्व प्रकाराला सरकार, कारखानामालक जबाबदार आहे,” अशी संतप्त भावना झालेल्या स्फोटात आई-वडील गमावलेल्या एका महिलेने व्यक्त केली.