अनामिका दुबेची बनली उजमा फातिमा; जिवंतपणीच आई वडिलांनी घातलं श्राद्ध अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 09:31 PM2023-06-11T21:31:54+5:302023-06-11T21:32:27+5:30
नर्मदा किनारी पोहचलेल्या आई वडील आणि भावाने जिवंत अनामिकाचे पिंडदान विधी पार केले
जबलपूर - मुलीनं धर्म बदलून मुस्लीम युवकाशी लग्न केले आणि अनामिका दुबेची उजमा फातिमा बनली. मुलीच्या या निर्णयानंतर तिच्या आई वडिलांनी जिवंतपणीच मुलीचे श्राद्ध घातले. कुटुंबाने मुलीच्या निधनाचे शोकपत्र छापले आणि नातेवाईकांसह गावकऱ्यांना तेराव्याच्या जेवणाला बोलावले. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ही घटना असून सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
जबलपूरच्या अमखेरा परिसरात राहणाऱ्या अनामिका दुबेने मोहम्मद अयाज नावाच्या मुस्लीम धर्मीय युवकाशी निकाह केला. लग्नानंतर अनामिका दुबेची उजमा फातिमा बनली. मुलीच्या या निर्णयाने आई वडील दुखावले. मुलीच्या उचललेल्या पाऊलाने त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर कुटुंबाने मुलीचा त्याग केला आणि तिच्या निधनाचे शोक पत्र छापले. त्यानंतर नर्मदा नदीच्या किनारी तिच्या पिंडदान केले.
नर्मदा किनारी पोहचलेल्या आई वडील आणि भावाने जिवंत अनामिकाचे पिंडदान विधी पार केले. त्यानंतर उपस्थितांना भोजन दिले. रविवारी नर्मदा किनारी झालेल्या या पिंडदानाची चर्चा शहरात पसरली. अनामिकाचे मामा नरेंद्र कुमार हे मुलीच्या घेतलेल्या निर्णयावर प्रचंड दुखी आहेत. पुराणात आणि हिंदू शास्त्रात पिंडदानाला विशेष महत्त्व असते.
पिंडदान केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. परंतु जिवंत व्यक्तीचे पिंडदान केल्यावरून पुरोहित म्हणाले की, नातेवाईकांनी जर कुटुंबातील सदस्याचा त्याग केला असेल तर त्यांच्या भावना समजून पिंडदान विधी पार केल्या जातात. तर सीएसपी अखिलेश गौर यांनी सांगितले की, युवक-युवतीच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाची मान्यता होती. परंतु या लग्नामुळे अनेक संघटनांनी तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. मुलीच्या कुटुंबाने तिला घरातून काढले.