केजरीवाल यांनी व्यक्त केली तुरुंगात जाण्याची भीती; तिकडे मोदी म्हणाले, कारवाई सुरूच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 06:52 PM2023-11-02T18:52:40+5:302023-11-02T18:55:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे नाव घेऊन, भ्रष्टाचाराविरोधात आपली कारवाई सुरूच राहील. भलेही, कितीही अपशब्द बोला, मात्र आपण कारवाई करतच राहणार, असे म्हटले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सकडे दुर्लक्ष करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी मध्य प्रदेशात प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अटकेची भीतीही व्यक्त केली. या निवडणुकीचा निकाल येईपर्यंत आपण तुरुंगात राहू शकतो. आपल्या शरीराला अटक केली जाऊ शकते पण विचारांना नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, छत्तीसगडमधील कांकेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे नाव घेऊन, भ्रष्टाचाराविरोधात आपली कारवाई सुरूच राहील. भलेही, कितीही अपशब्द बोला, मात्र आपण कारवाई करतच राहणार, असे म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत सिंगरौली येथील उमेदवार राणी अग्रवाल यांच्यासाठी रोड शो केला. यानंतर ते लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'ते मला रोज अटकेची धमकी देतात. केजरीवालच्या शरीराला तर अटक कराल, पण केजरीवालच्या विचारांना कशी अटक कराल? हजारो लाखो केजरीवालांना कशी अटक कराल?'
केजरीवाल तुरुंगात जाण्यास घाबरत नाहीत -
केजरीवाल म्हणाले, पूर्वी दिल्ली घोटाळ्यांसाठी ओळखली जात होती, पण आज चांगल्या शाळा, रुग्णालये आणि वृद्धांच्या तीर्थयात्रांची चर्चा होत आहे. अण्णांच्या आंदोलनाचा उल्लेख करत केजरीवाल म्हणाले, सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यासह रामलीला मैदानावरील मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांना अटक केली जाऊ शकते. पण आलेल्या कोट्यवधी लोकांना कसे अटक करणार? एवढेच नाही, तर त्यांनी आम्हाला अटक केली तरी हरकत नाही. केजरीवाल तुरुंगात जाण्यास घाबरत नाहीत," असेही केजरीवाल म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी -
मोदी म्हणाले, 'ही मोदीची गॅरंटी आहे. लूट करणारा एकही सुटणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे. याच कामासाठी तुम्ही मला निवडून दिले आहे. मजा करण्यासाठी निवडून दिले नाही. आपणच सांगा हे कमी करायला हवे की नको? संपूर्ण शक्तीनिशी सांगा, हे दिल्लीतील राहणाऱ्यांनाही समजायला हवे. चोर, दरोडेखोरांना शिक्षा व्हायला हवी की नको? भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला हवे की नाही? गरिबांचा पैसे परत यायला हवा की नको? आपल्या आशीर्वादाने मी हे काम थांबवणार नाही. या लोकांनी मला भलेही लाखो शिव्या देवोत, मात्र तुमच्या आशिर्वादी शक्ती आहे की, ना मोदी डगमगतो, ना मोदी घाबरतो, ना मोदी भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई रोखतो.'