भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 17:46 IST2024-05-12T17:45:15+5:302024-05-12T17:46:12+5:30
Jaiprakash Kirar : या अपघातात गंभीर जखमी झाल्याने जयप्रकाश किरार यांचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
BJP Leader Jaiprakash Kirar Accident Death : नर्मदा नदीतून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात आवाज उठवणारे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश किरार यांचा रस्ता अपघातात संशयास्पद मृत्यू झाला. जयप्रकाश किरार यांच्या कारला एका डंपरने मागून धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने जयप्रकाश किरार यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर कार पंक्चर झाल्यानंतर ते टायर बदलण्यासाठी कारमधून खाली उतरले. यानंतर ते रिझर्व्ह टायर बाहेर काढण्यासाठी कारच्या मागे गेले असता अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जयप्रकाश किरार यांना जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खानपुरा गावाजवळ घडली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि भाजपा नेते जयप्रकाश किरार यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जयप्रकाश किरार हे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिता किरार यांचे पती होते. ते मध्य प्रदेश कार्यकारिणीचे सदस्यही होते. अपघातानंतर शोकाकुल कुटुंबासह भाजपामध्ये सध्या शोककळा पसरली आहे.