जिथून १२० च्या स्पीडने ट्रेन जाते, तिथल्या ट्रॅकच्या शेकडो चाव्याच अज्ञातांनी काढल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:42 AM2023-06-20T08:42:31+5:302023-06-20T08:42:44+5:30
आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत १५८ चाव्या ताब्यात घेतल्या. रेल्वेने या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्याच कोरोमंडलम एक्स्प्रेससारखा भीषण रेल्वे अपघात टळला आहे. अज्ञातांनी मुंबी-हावडा रेल्वे मार्गाच्या रुळांना बांधून ठेवणाऱ्या सुमारे १५८ चाव्या काढून टाकल्या होत्या. रविवारी रात्रीच्या अंधारात महाकौशल एक्स्प्रेस जात असताना एका पोत्याला आदळली. आवाजावरून लोको पायलटच्या काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्या पोत्यांमध्ये ट्रॅकच्या चाव्या असल्याचे वाटल्याने त्याने रेल्वे प्रशासनाला माहिती दिली, यामुळे मागून येणाऱ्या दोन रेल्वे वाचल्या आहेत.
आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत १५८ चाव्या ताब्यात घेतल्या. रेल्वेने या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे या भागात मोठा रेल्वे अपघात टळला आहे. ही घटना रात्री सव्वा नऊच्या सुमारासची आहे. रेल्वे ट्रॅकवरील ३७ काँक्रिटचे स्लीपर अनलॉक होते.
महाकौशलच्या पाठीमागून जबलपुर-रीवा इंटरसिटी आणि ताप्ती गंगा एक्स्प्रेस होती. या ट्रेन तातडीने थांबविण्यात आल्या. ४० मिनिटांचा ब्लॉक घेत पुन्हा चाव्या बसविण्यात आल्या. यानंतर सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत सर्व ट्रेन त्या भागातून ३० किमी प्रति तासाच्या वेगाने नेण्यात आल्या.
गेल्या महिन्यात रेल्वे अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करण्यात आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर गेल्याने त्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला आदळली होती. तर पलिकडील ट्रॅकवर तिचे दोन डबे कोसळले होते. तितक्यात त्या ट्रॅकवरून एक ट्रेन येत होती, ती त्या दोन डब्यांवर आदळली होती.