... म्हणून सुनेच्या निधनानंतर सासूलाच १ कोटी ३१ लाख रु. देण्याचे न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:49 PM2023-08-29T17:49:36+5:302023-08-29T17:50:58+5:30
आयुष व श्वेता १६ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री दीड वाजता हॉटेलमधून जेवण करुन परत येताना त्यांच्या कारला अपघात झाला होता.
इंदौर - मध्य प्रदेशातील इंदौर येथे मुलगा आणि सुनेच्या मृत्यूनंतर सासूला १ कोटी ३१ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. स्कीम ९४ येथील रहिवाशी आयुष आणि पत्नी श्वेता दीक्षित यांच्या मृत्युशी संलग्नित हे प्रकरण आहे. आयुष आणि श्वेता यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आयुष सेल्स एक्झिक्युटीव्ह तर श्वेता ह्या बँकेत मॅनेजर होत्या. मात्र, एका भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.
आयुष व श्वेता १६ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री दीड वाजता हॉटेलमधून जेवण करुन परत येताना त्यांच्या कारला अपघात झाला होता. बॉम्बे हॉस्पीटलजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांची कार धडकली. त्यात, दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर श्वेताच्या सासू मालतीदेवी, सासरे गौरीशंकर दीक्षित (५३) आणि दीर दिव्यांश यांनी कोर्टात खटला दाखल केला होता. याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय देत, व्याजासह १.३१ कोटी रुपये देण्याचे बजावले. याप्रकरणी, कोरोना कालावधीत सासरे गौरीशंकर यांचे निधन झाल्याने, ही सर्व रक्कम सासूबाई मालतीदेवी यांच्या बँक खात्यात देण्याचे आदेश न्यायालायने दिले आहेत. त्यामध्ये, सुनेकडून ८२.१२ लाख तर मुलाकडून ४९.८६ लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. त्यापैकी, सुनेकडील १९.४८ लाख रुपयांची एफडी तर मुलाकडील रकमेची २० लाख रुपयांची एफडी करण्याचेही न्यायालयानेही आदेशात म्हटले आहे.
याप्रकरणी न्यायालयाने म्हटले की, सासू मालतीदेवी ह्या भलेही सून श्वेतावर विसंबून नव्हत्या. मात्र, हिंदू विवाह अधिनियम कायद्यान्वये सासू मालतीदेवी ह्या सुनेच्या प्रेमापासून वंचित राहिल्या. सासूचे तिच्याशी प्रेम, स्नेह, मार्गदर्शन आणि भरणपोषण सर्वकाही दूर गेलं. त्यामुळेच, सुनेच्या मृत्यूनंतरची आर्थिक मदत ही सासूलाच मिळायला हवी. सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे ही संपूर्ण रक्कम सासूबाईंच्या खात्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.