मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
By श्रीकृष्ण अंकुश | Published: May 25, 2024 07:36 AM2024-05-25T07:36:26+5:302024-05-25T07:38:06+5:30
'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत...
अभिलाष खांडेकर -
भोपाळ : मध्य प्रदेशात उघडकीस आलेल्या नर्सिंग महाविद्यालयांच्या घोटाळ्यात गुंतलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे तसेच त्याव्दारे या महाविद्यालयांतील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचे यादव सरकारने ठरविले आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या घोटाळ्याची सीबीआयने चौकशी केली. सीबीआयचे इन्स्पेक्टर राहुल रा यांना बडतर्फ करण्यात आले असून, अन्य काही जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते. त्यातील काही लोकांवर याआधीच गुन्हे दाखल झाले आहेत.
सीबीआयचे डीएसपी आशिष प्रसाद, सुशीलकुमार माजोका आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन शिक्षणाचे दुकान उघडून बसलेले काही महाविद्यालयांचे संचालक यांच्यावर एफआयआरही दाखल झाले आहेत.
...असा झाला घोटाळा
नर्सिंग महाविद्यालयाचा घोटाळा २०२१मध्ये सर्वप्रथम उजेडात आला हाेत. ३६४ कॉलेजचा सीबीआयने तपास केला. त्यातील १७० महाविद्यालयांमध्ये योग्य व्यवस्था होती. मात्र, ६६ महाविद्यालयांमध्ये नर्सिंगचा अभ्यासक्रम चालविण्यासाठी पुरेशा सुविधाच नव्हत्या. बाकीच्या महाविद्यालयांतील स्थिती ही यथातथाच होती, असे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले.