Lok Sabha Election Result 2024 : भाजपसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ठरले ‘लकी’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 07:10 AM2024-06-07T07:10:28+5:302024-06-07T07:12:05+5:30
पक्षाचे कार्यकर्ते या शानदार यशाचे श्रेय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांना देत आहेत.
- अभिलाष खांडेकर
भोपाळ : भाजपचा उत्तर प्रदेशचा बालेकिल्ला डळमळला असताना पक्षाची प्रयोगशाळा संबोधल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशने सर्व २९ जागा पक्षाच्या झोळीत टाकून सर्वांना चकित केले आणि एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वाचवली. पक्षाचे कार्यकर्ते या शानदार यशाचे श्रेय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांना देत आहेत.
आपला विस्तीर्ण परिसर भगव्या रंगात रंगवणारे हे देशातील एकमेव मोठे राज्य आहे. जनसंघाच्या काळापासून अस्तित्वात असलेला पक्षाचा हा जुना किल्ला आजही अभेद्य असल्याचे येथील मतदारांनी दाखवून दिले. पक्षाने केवळ सर्वच जागा जिंकल्या नाहीत तर मतांची टक्केवारीही अभूतपूर्व ५९.२६ टक्क्यांपर्यंत नेली आहे. डॉ. यादव यांनी सकार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यात यश मिळवले आहे.
बालेकिल्ला हिसकावला
काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा बालेकिल्ला असलेला छिंदवाडा मतदारसंघही भाजपने हिसकावून घेतला. तेथे कमलनाथ यांचे पुत्र नकुल यांचा विवेक साहू या नवख्या उमेदवाराने पराभव केला. राजगडमधून निवडणूक हरलेले दिग्विजय सिंह २००३ मध्ये सत्तेतून बाहेर फेकले जाण्यापूर्वी काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. पक्षाचे समर्पित कार्यकर्ते आणि पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीमुळे मध्य प्रदेशात यश मिळाले आहे, असे डॉ. यादव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
सर्व जागा जिंकणारा दुसराच पक्ष
यापूर्वी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अखंड मध्य प्रदेशात १९८४-८५ मध्ये काँग्रेसने सर्वच्या सर्व ४० जागा जिंकल्या होत्या. तथापि, त्यानंतर पहिल्यांदाच तत्कालीन अखंड मध्य प्रदेश विचारात घेतल्यास एका पक्षाने एकूण ३९ जागा (मध्य प्रदेशातून २९ आणि छत्तीसगडमधून १०) जिंकल्या आहेत.