रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:01 PM2024-05-06T12:01:02+5:302024-05-06T12:02:27+5:30
Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या भाजपाच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमधील गुणा येथे प्रचार रथावर स्वार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी अचानक उंचावलेली गदा तिथे उपस्थित असलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या भाजपाच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमधील गुणा येथे प्रचार रथावर स्वार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी अचानक उंचावलेली गदा तिथे उपस्थित असलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उंचावलेली गदा त्यांच्यासोबत असलेले आमदार रामनिवास रावत यांना लागली. सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही.
दिग्विजय सिंह यांचं गृहक्षेत्र असलेल्या राजगडमध्ये भाजपाने आपले उमेदवार रोडमल नागर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांना कुणीतरी गदा भेद दिली होती. मुख्यमंत्र्यांनी ही गदा उंचावून फिरवली. मात्र त्यांना अंदाज न आल्याने ही गदा आमदार रामनिवास रावत यांच्या डोक्याला जाऊन लागली. या प्रकारामुळे मुख्यमंत्रीही गोंधळले. तसेच त्यांनी ही गदा तिथे बाजूला उपस्थित असणाऱ्यांकडे देत रामनिवास रावत यांची विचारपूस केली. तसेच आपल्या डोक्यावरील फेटा त्यांच्या डोक्यावर घातला. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार रामनिवास रावत हे हल्लीच काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झाले आहेत. विजयपूर विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा विजयी झालेल्या रामनिवास रावत यांनी माजी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासमोर लोकसभेची निवडणूक लढलली होती. ते मध्य प्रदेशमधील ओबीसी समाजातील बडे नेते मानले जातात.