‘पहले आप’मध्ये अडकले जाहीरनामे; काेण काय आश्वासन देताे? भाजप-काॅंग्रेसचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:43 AM2023-11-08T05:43:29+5:302023-11-08T07:09:36+5:30
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : मध्य प्रदेशात निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र, भाजप आणि काॅंग्रेसने अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. दाेन्ही पक्ष आधी एकमेकांच्या जाहीरनाम्यावर लक्ष ठेवून आहेत. यावरून ‘पहले आप’चा खेळ सुरू असून, सातत्याने जाहीरनामा प्रसिद्ध हाेण्याच्या तारखा दाेन्ही पक्ष बदलत असल्याचे चित्र आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे. मतदानाच्या चार दिवस आधी छत्तीसगडमध्ये भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काॅंग्रेसने त्यांचे वचनपत्र जाहीर केले. काॅंग्रेसने भाजपनेच दिलेल्या आश्वासनांचे मूल्य वाढविले. म्हणूनच मध्य प्रदेशात दाेन्ही पक्ष सावध आहेत. समाेरचा काय जाहीर करताे, हे पाहून आपला जाहीरनामा तयार करीत असल्याचे दिसत आहे.
जिंकण्यासाठी माेठ्या हव्यात घाेषणा
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशाेक गेहलाेत यांनी यापूर्वीच १०० युनिट वीज माेफत, शेतकऱ्यांची कर्जमाफी, माेफत धान्य वितरण यांसारख्या घाेषणा केल्या आहेत. त्यांना शह देण्यासाठी भाजपला यापेक्षा माेठ्या घाेषणा करणे आवश्यक आहे.
छत्तीसगडमध्ये काय झाले?
- काेणता पक्ष काय माेफतच्या याेजना देणार, यावरच निवडणूक लढविण्यात येत असल्याचे दिसत आहे.
- भाजपने छत्तीसगडमध्ये धानाला ३,१०० रुपये भाव देण्याची घाेषणा केली; तर काॅंग्रेसने दुसऱ्याच दिवशी हा भाव ३,२०० रुपये करण्याचे आश्वासन दिले.
- भाजपने तेंदुपत्ता संकलन करणाऱ्यांना ५,५०० रुपये, तर काॅंग्रेसने ६ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
- दाेन्ही पक्षांनी घरगुती गॅस सिलिंडर ५०० रुपयांत देण्याची घाेषणा केली असून, १० लाख रुपयांपर्यंतचा उपचार माेफत करण्याचेही जाहीर केले आहे.