"भाजप एसी रूममध्ये बसून पक्ष चालवत नाही"; पंतप्रधान मोदींनी देशभरातील कार्यकर्त्यांशी साधला संवाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 01:39 PM2023-06-27T13:39:22+5:302023-06-27T13:40:00+5:30
'मेरा बूथ, सबसे मजबूत' या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भोपाळ: भारतीय जनता पक्षाची (भाजप) सर्वात मोठी ताकद पक्षाचे सर्व कार्यकर्ते आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. 'मेरा बूथ, सबसे मजबूत' या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "भोपाळमध्ये आयोजित 'मेरा बूथ, सबसे मजबूत' हा कार्यक्रम आमच्या कष्टकरी कार्यकर्त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल."
मध्य प्रदेशातील भोपाळमधील भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि तुम्ही (कार्यकर्ते) सतत मेहनत घेत आहात. यासंबंधीची माहिती माझ्यापर्यंत पोहोचत आहे. जेव्हा मी अमेरिका आणि इजिप्तमध्ये होते, त्यावेळी तुमच्या कामांची माहिती मला सतत मिळत होती. तिथून परतल्यावर तुम्हा लोकांना भेटणे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे."
याचबरोबर, "भाजपची सर्वात मोठी ताकद तुम्ही सर्व कार्यकर्ते आहेत. आज मी एकाच वेळी बूथवर काम करणाऱ्या १० लाख कार्यकर्त्यांना संबोधित करत आहे. कदाचित कोणत्याही राजकीय पक्षाच्या इतिहासात तळागाळात एवढा मोठा कार्यक्रम कधीच आयोजित केला गेला नसेल, जितका आज येथे होत आहे.तुम्ही केवळ भाजपचेच नाही तर देशाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मजबूत सैनिकही आहात. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी देशाचे हित सर्वोपरि आहे, पक्षापेक्षा देश मोठा आहे. जिथे पक्षापेक्षा देश मोठा असतो…अशा कर्मठ कार्यकर्त्यांशी बोलणे माझ्यासाठी एक मंगल उत्सव आहे…मलाही खूप उत्सुकता आहे", असे नरेंद्र मोदी म्हणाले.
"बूथ हे स्वतःच एक खूप मोठे युनिट आहे आणि आपण बूथच्या या युनिटला कधीही कमी लेखू नये. अशा अनेक गोष्टी आहेत जिथे ग्राउंड फीडबॅक खूप महत्वाचा आहे आणि यामध्ये आमचे बूथचे सहकारी खूप मोठी भूमिका बजावतात. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी यशस्वी धोरण आखले तर त्यामध्ये बूथ स्तरावरील माहितीची मोठी ताकद आहे, अस मानले पाहिजे. एसी रूममध्ये बसून पक्ष चालवणाऱ्या आणि फतवे काढणाऱ्यांपैकी आम्ही नाही. आम्ही ते लोक आहोत, जे गावोगावी जाऊन प्रत्येक मौसममध्ये, प्रत्येक परिस्थितीत...लोकांमध्ये घालवतात", असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.