"काही लोक धर्माची खिल्ली उडवतात; माझे बंधू धीरेंद्र शास्त्री..."; PM मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 16:41 IST2025-02-23T16:41:07+5:302025-02-23T16:41:47+5:30
PM Modi at Bageshwar Dham: "बंधूंनो, आजकाल काही नेत्यांचा एक गट तयार झाला आहे, जे धर्माची खिल्ली उडवतात. हिंदूंच्या श्रद्धांचा द्वेष करतात. आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरांवर हल्ला करतात आणि आपल्या सणांबद्दल आणि परंपरांबद्दल अपशब्द बोलत असतात."

"काही लोक धर्माची खिल्ली उडवतात; माझे बंधू धीरेंद्र शास्त्री..."; PM मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन
पंतप्रधान नरेद्र मोदी आज (रविवार) दुपारी २ वाजता बागेश्वर धाम येथे आले होते. त्यांनी येथे बालाजी मंदिरात पूजा केली. यानंतर, व्यासपीठावरून बटन दाबून 'बागेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इंस्टिट्यूट'चे भूमिपूजन केले. या रुग्णालयाचा कर्करोग पीडीत आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा लाभ होईल. यावेळी मोदी म्हणाले, "बंधूंनो, आजकाल काही नेत्यांचा एक गट तयार झाला आहे, जे धर्माची खिल्ली उडवतात. हिंदूंच्या श्रद्धांचा द्वेष करतात. आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरांवर हल्ला करतात आणि आपल्या सणांबद्दल आणि परंपरांबद्दल अपशब्द बोलत असतात."
धीरेंद्र शास्त्रींचा छोटे भाऊ, असा उल्लेख -
पंतप्रधान पुढे म्हणाले, "माझे छोटे बंधू धीरेंद्र शास्त्री लोकांना जागरूक करत असतात. एकतेचा मंत्र देत असतात. आता त्यांनी हे कर्करोग रुग्णालय उभारण्याची जबाबदारीही घेतली आहे. अर्थत आता बागेश्वर धाममध्ये भजन, भोजन आणि निरोगी जीवनाचा आशीर्वादही मिळेल. या कामासाठी मी धीरेंद्र शास्त्री यांचे अभिनंदन करतो."
यावेळी, बागेश्वर सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव देखील उपस्थित होते. बागेश्वर धाम मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्यात आहे.
आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी के साथ आज बागेश्वर धाम कैंसर हॉस्पिटल के भूमि पूजन में ....#bageshwardhampic.twitter.com/AbrsjFrgpb
— बागेश्वर बाबा (@BageshwarBaba_) February 23, 2025
'यावेळी बालाजींनी बोलावले' -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "मला फार कमी दिवसांतच दुसऱ्यांदा वीरांची भूमी असलेल्या बुंदेलखंडात येणयाचे सौभाग्य लाभले. यावेळी थेट बालाजींकडूनच बोलावणे आले. हनुमानजींच्या आशीर्वादाने, हे श्रद्धेचे केंद्र आता आरोग्याचे केंद्र बनणार आहे. मी येथील बागेश्वर धाम कर्करोग वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचे भूमिपूजन केले. ही संस्था १० एकर एवढ्या परिसरात असेल. पहिल्या टप्प्यातच येथे १०० खाटांची सुविधा मिळेल. याबद्दल मी बुंदेलखंडच्या जनतेचे अभिनंदन करतो.
बागेश्वर धामचे हे नवीन रुग्णालय २५२ कोटी रुपये खर्चून बांधले जाणार आहे. हे रुग्णालय २.३७ लाख चौरस फूट जागेत बांधण्यात येणार आहे. या इमारतीत नैसर्गिक प्रकाश आणि कमीत कमी आवाज असेल. तसेच या रुग्णालयाचा आकार पिरॅमिडसारखा असेल.