२०१६ मध्ये भविष्यवाणी अन् २०२३ मध्ये बनले मुख्यमंत्री; मोहन यादवांचे गुरू कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 11:43 AM2023-12-12T11:43:58+5:302023-12-12T11:44:44+5:30
आत्मानंद दास स्वामी उर्फ नेपाळी बाबा नावाने ते कदाचित नेपाळशी संबंधित आहेत असं सगळ्यांना वाटते. परंतु असे नाही.
अयोध्या - मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी डॉ. मोहन यादव यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत ज्यावेळी मोहन यादव यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदी घोषणा झाली तेव्हा प्रत्येकजण हैराण झाला. मोहन यादव यांची उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर इथं सासरवाडी आहे. इथेही मोहन यादव शिक्षणमंत्र्यांपासून थेट मुख्यमंत्री बनतील यावर अनेकांना विश्वास बसला नाही. परंतु यामागे काहींचा दावा आहे की, अयोध्येतील नेपाळी बाबा यांचा आशीर्वाद आहे. ज्यांनी उज्जैनच्या महाकुंभवेळी मोहन यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाची भविष्यवाणी केली होती.मोहन यादव हे नेपाली बाबाचे शिष्य आहेत. सिंहस्थ कुंभ मेळ्यात बाबाने आयोजित केलेल्या राम नाम जप महायज्ञात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोण आहे नेपाळी बाबा?
नेपाळी बाबा उर्फ आत्मानंद दास स्वामी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राहतात. याठिकाणी रामघाटमध्ये सीताराम आश्रमाची त्यांनी स्थापना केली. राजकारणात ते भाजपाचे समर्थक मानले जातात. मोहन यादव मुख्यमंत्री बनल्यानंतर नेपाळी बाबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी मोहन यादव यांचा उल्लेख परम शिष्य असा केला. नेपाळी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक आहेत. अलीकडेच त्यांनी मोदींना राम अवतार आणि योगी आदित्यनाथ यांना लक्ष्मण म्हटलं होते. राम मंदिराच्या लोकार्पणाला ५० लाख संतांना भोजन देण्याच्या त्यांच्या घोषणेने ते चर्चेत आले.
नेपाळी बाबा नाव कसं पडलं?
आत्मानंद दास स्वामी उर्फ नेपाळी बाबा नावाने ते कदाचित नेपाळशी संबंधित आहेत असं सगळ्यांना वाटते. परंतु असे नाही. ते अयोध्येत राहणारे आहेत. एका मुलाखतीत नेपाळी बाबांनी स्पष्ट केले की, मी नेपाळचा नाही तर अयोध्येतील आहे. नेपाळमध्ये ज्याठिकाणी प्रभू रामाने शिव धनुष्य तोडले होते त्या जागेला धनुष धाम म्हणतात. मी तिथे आश्रम बनवला आहे. आश्रमाच्या स्थापनेनंतर जेव्हा मी नेपाळमधून निघालो तेव्हा तिथल्या स्थानिकांनी मला न जाण्याचा आग्रह केला. जर तुम्हाला जायचे असेल तर नेपाळला सोबत घेऊन चला तेव्हापासून माझे नाव नेपाळी बाबा असं पडल्याचे ते सांगतात.