बागेश्वर बाबांवर भक्तांनी केली पैशांची उधळण; २०० रुपयांच्या हजारो नोटा हवेत उडवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:48 PM2023-07-05T13:48:11+5:302023-07-05T13:48:53+5:30
Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर बाबा यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.
Bageshwar Dham Dhirendra Shastri:बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा सध्या देशभरात अनेक ठिकाणी दिव्य दरबार भरवत आहेत. हजारो-लाखो भाविक या दरबारांना उपस्थित राहत आहेत. यातच आता एका दरबारात बागेश्वर बाबा यांच्यावर भक्तांकडून हजारो रुपयांची उधळण करण्यात आली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री २७ वर्षांचे झाले आहेत. ०४ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. छतरपूरपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर येथे त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात भक्त बागेश्वर बाबांच्या वाढदिवसानिमित्त हजाराच्या नोटा हवेत उडवत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे म्हटले जात आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर नोटांचा वर्षाव होत असून तेथे उपस्थित लाखो भाविक टाळ्या वाजवत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. २००-२०० रुपांच्या नोटा भाविकांनी हवेत उडवल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरात येथून आलेल्या भक्तांनी केला नोटांचा वर्षाव
मिळालेल्या माहितीनुसार, नोटांची उधळण गुजरातहून आलेल्या बाबांच्या भक्तांनी केला आहे. बागेश्वर बाबा यांच्या जन्मदिनानिमित्त ०१ जुलैपासून बागेश्वर धाममध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. ०१ ते ०३ जुलै या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला आणि ०४ जुलै रोजी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, दिल्लीत बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार भरणार असून, या ठिकाणी ते हनुमान कथा सांगणार आहेत. काही दिवसांपासून याच ठिकाणी बालाजी महाराजांचा ध्वज उभारत भूमिपूजन करण्यात आले होते. ४ दिवस हा सोहळा सुरू राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. यादरम्यान अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.