महिलेचे फोटो काढले, मारहाण, बलात्काराचा प्रयत्न, विरोध केल्यावर नराधमांनी धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:23 PM2023-06-22T12:23:50+5:302023-06-22T12:24:32+5:30
Crime News: मुझफरपूर येथून गुजरातला जाणाऱ्या सूरत एक्स्प्रेसमध्ये नराधमांनी एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने विरोध केला. तेव्हा या नराधमांनी या महिलेसह तिच्या नातेवाईकाला ट्रेनमधून खाली फेकून दिले.
उत्तर प्रदेशमधील मुझफरपूर येथून गुजरातला जाणाऱ्या सूरत एक्स्प्रेसमध्ये नराधमांनी एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने विरोध केला. तेव्हा या नराधमांनी या महिलेसह तिच्या नातेवाईकाला ट्रेनमधून खाली फेकून दिले. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्वाल्हेरमधील बिलोआ पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. ही महिला झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील रहिवासी असून, १९ जून रोजी ती तिच्या नातेवाईकासोबत सूरत एक्स्प्रेसमधून लखनौ येथून गुजरातला जात होती. दरम्यान, ग्वाल्हेर येथे पाच जण ट्रेनमध्ये चढले. ते महिलेच्या समोरील सीटवर बसले. काही वेळाने आरोपींनी महिलेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
पीडितेने बिलौआ पोलीस ठाणे पोलिसांना सांगितले की, आरोपी माझे फोटो काढतत होते. मी विरोध केला तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या नातेवाईकांना मारहाण केली. त्यानंतर ही महिला आणि तिचा नातेवाईक दरवाजाजवळ जाऊन थांबले. तेव्हा आरोपींनी तिथे येत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र महिलेने त्यांना विरोध केला तेव्हा आरोपींनी या महिलेला आणि तिच्या नातेवाईकाला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. ही महिला आणि तिचा नातेवाईक संपूर्ण रात्रभर रेल्वेच्या रुळांवर बेशुद्धावस्थेत पडून होते. सकाळी ग्रामस्थांनी त्यांना पाहिले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ही महिला आणि तिच्या नातेवाईकाला गँगमन आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात पोहोचवले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. ग्वाल्हेरचे एसपी राजेश सिंह चंदेल यांनी एसडीओपी डबरा आणि बिलौआचे ठाणे प्रभारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रेनच्या डब्यात किती लोक होते. या घटनेत कोण कोण सहभागी होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.