एक काळ गाजवला, आता मराठी नेत्यांच्या युगाचा अस्त झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 08:47 AM2024-04-07T08:47:29+5:302024-04-07T08:48:25+5:30
मध्य प्रदेशातील मराठी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे शेजवळकर हे शेवटचे नेते ठरले
अभिलाष खांडेकर
भोपाळ : ग्वाल्हेरचे विद्यमान खासदार विवेक नारायण शेजवळकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणातून मराठी नेते पूर्णत: बाजूला फेकले फेकले आहेत. मध्य प्रदेशात मराठी समुदाय मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या राज्यात अनेक मराठी राजकीय नेते उदयास आले होते.
मध्य प्रदेशातील मराठी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे शेजवळकर हे शेवटचे नेते ठरले. आता हा समाज नेतृत्वहीन झाला आहे. शेजवळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित परिवारातून आलेले आहेत. त्यांचे वडील ग्वाल्हेरचे महापौर होते. शिंदे राजघराण्याचा गड समजल्या जाणाऱ्या ग्वाल्हेरमधून शेजवलकरांनी खासदारकीची पाच वर्षे पूर्ण केली. आता त्यांच्या जागी माजी मंत्री भारतसिंग कुशवाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत हरलेले कुशवाह हे मध्य प्रदेश विधानसभाध्यक्ष नरेंद्रसिंह तोमर यांच्या जवळचे समजले जातात. तसेच ओबीसी मतदारांचे समीकरण पाहून कुशवाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्रिपदाला हुलकावणी
मराठी नेता कधीच मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. मात्र, भाजपात मराठी नेते मोठ्या संख्येने होते. राजेंद्र धारकर (इंदूर), सुधाकर बापट (सागर), मधुकरराव हरणे (होशंगाबाद), मुकुंद सखाराम नेवाळकर (छत्रपूर), बाबूराव परांजपे (जबलपूर), नारायण धर्मा (इंदूर), डॉ. एम. एस. इंदापूरकर व भाऊसाहेब पोतनीस (ग्वाल्हेर) आणि ८ वेळा इंदूरच्या खासदार राहिलेल्या सुमित्रा महाजन यांचा त्यामध्ये समावेश आहे. यापैकी बहुतेक जण एक तर बाजूला फेकले गेले आहेत किंवा निधन झाले आहे.
सुमित्रा महाजनांनी इंदूरला बनविले भाजपचा बालेकिल्ला
यंदा शेजवलकरांना ज्याप्रमाणे उमेदवारी नाकारण्यात आली, त्याचप्रमाणे सुमित्रा महाजन यांना २०१९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. महाजन यांनी इंदूरला भाजपचा बालेकिल्ला बनविले. १९८९ मध्ये त्यांनी ही जागा काँग्रेसचे दिग्गज नेते पी. सी. सेठी यांच्याकडून खेचून घेतली होती. नंतर जवळपास ३० वर्षे त्यांनी ही जागा सांभाळली.
काँग्रेसमध्येही होते मराठी नेते
काँग्रेसमध्येही अनेक मराठी नेते होते. ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील माधवराव शिंदे हे त्यात प्रमुख होत. त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य हे आता भाजपात आहेत. माधवरावांच्या भगिनी यशोधरा राजे शिवराजसिंग मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होत्या. देवासच्या राजघराण्यातील तुकोराजीराव पवार हे भाजप सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेसचे डॉ. रघुनाथ पाप्रिकर हे ग्वाल्हेरचे महापौर होते.
दिल्लीकडून मराठी समुदायाला बाजूला सारले जात असताना समुदायातून आवाज उठताना दिसत नाही. आरएसएसमधील मराठी प्रभुत्वही कमी होताना दिसत आहे.
अरुण दीक्षित, राजकीय विश्लेषक
मराठी संस्थानांचा प्रभाव
पूर्वीच्या मध्य प्रांतात इंदूर, ग्वाल्हेर, देवास आणि धार यांसारखी मराठी संस्थाने समाविष्ट होती. इंदूर, उज्जैन, बेतुल, ग्वाल्हेर, भिंड, विदिशा, सागर, जबलपूर, होशंगाबाद, धार आणि देवास या भागात मराठी लोकसंख्या एकवटली आहे. छत्तीसगडमध्येही मराठी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.