युनियन कार्बाइड कचरा : दोन आंदोलकांचे आत्मदहन'; पिथपुरम येथे पुकारले बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:16 IST2025-01-04T14:16:13+5:302025-01-04T14:16:42+5:30
दोघे ४० वर्षे वयाचे असून, त्यांना पिथमपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नंतर इंदूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे असे धारचे पोलिस अधीक्षक मनोज सिंग यांनी सांगितले. पिथमपुर बचाव समितीने पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी शहरातील दुकाने आणि बाजारपेठा बंद राहिल्या.

युनियन कार्बाइड कचरा : दोन आंदोलकांचे आत्मदहन'; पिथपुरम येथे पुकारले बंद आंदोलन
धार : युनियन कार्बाइडच्या ३३७ टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मुद्यावरून मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे पुकारलेल्या बंददरम्यान शुक्रवारी दोन व्यक्तींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना इंदूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन जणांनी अंगावर काही द्रवपदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतल्याचे काही व्हिडीओ, तसेच प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती यातून उघड झाले होते.
दोघे ४० वर्षे वयाचे असून, त्यांना पिथमपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नंतर इंदूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे असे धारचे पोलिस अधीक्षक मनोज सिंग यांनी सांगितले. पिथमपुर बचाव समितीने पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी शहरातील दुकाने आणि बाजारपेठा बंद राहिल्या.
या समितीने दावा केला की, युनियन कार्बाइडच्या कचऱ्याची विल्हेवाट लावल्यामुळे स्थानिक रहिवासी व पर्यावरणावर घातक परिणाम होऊ शकतो. पिथमपुरची लोकसंख्या १.७५ लाख आहे आणि तेथील औद्योगिक क्षेत्रात शेकडो कारखाने आहेत. १९८४ मध्ये २ डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाइडच्या भोपाळ येथील कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेटची (एमआयसी) गळती होऊन किमान ५,४७९ लोकांचा मृत्यू झाला, तसेच त्यामुळे हजारो लोक गंभीर आजारांनी ग्रस्त झाले.
भोपाळमधून ३३७ टन कचरा पिथमपुर येथे शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी हलवण्यात आला आहे; पण या निर्णयामुळे मध्य प्रदेशात तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. काही आंदोलकांनी इशर मोटर्सजवळ रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सौम्य लाठीमार करून निदर्शकांना पांगविले.
कचऱ्याच्या मुद्द्यावरून राजकारण करू नका
- गेल्या ३ डिसेंबरला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने युनियन कार्बाइड येथील कचरा न हटविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गेली ४० वर्षे पडून असलेला हा कचरा युनियन कार्बाईड कंपनीच्या जागेतून चार आठवड्यांत हलवावा असा आदेश न्यायालयाने दिला.
- या कचऱ्याच्या मुद्द्यावरून कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केले. या कचऱ्यामध्ये ६० टक्के माती, ४० टक्के नाफ्था असून त्यामुळे कोणतेही हानिकारक परिणाम होणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.