कमलनाथांचा चिरेबंदी ‘किल्ला’ यावेळी भाजप भेदू शकणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:41 AM2024-04-09T06:41:12+5:302024-04-09T06:41:23+5:30
देशातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या मतदारसंघात काय होणार?
मुंबई : मध्य प्रदेशातला छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या कमलनाथ यांचा ‘चिरेबंदी’ किल्ला समजला जातो. सन २०१९ मध्ये देशभरात आलेली मोदी लाटही या वाड्याला धडक देऊ शकली नव्हती. कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ येथून विजयी झाले होेते.
चार दशकांपासून छिंदवाड्यातील मतदारांनी कमलनाथ आणि पर्यायाने काँग्रेसला साथ दिली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून कमलनाथ यांची या मतदारसंघावरील पकड सैल पडू लागल्याचे चित्र आहे. अगदी अलीकडे विधानसभा निवडणुकीनंतर स्वत: कमलनाथ भाजपच्या वळचणीला जातील, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तसे काही झाले नाही. पण या निवडणुकीत नकुलनाथ यांना तगडे आव्हान भाजपने विवेक बंटी साहू यांच्या रूपाने उभे केले आहे. त्यामुळे कमलनाथ यांचा कस लागणार आहे. १९ एप्रिल राेजी निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात येथे मतदान
हाेणार आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
संत्री आणि कापूस हे दोन मुख्य पिके आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे ही दोन्ही पिके भुईसपाट झाली. याकडे काँग्रेस आणि भाजप दोघांनीही कानाडोळा केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.
कमलनाथ यांचे निकटवर्तीय आता हळूहळू भाजपकडे जाऊ लागले आहेत. आतापर्यंत तीन आमदार, २० हून अधिक सरपंच आणि नगरसेवक यांनी पाठ फिरविली. त्यामुळे कमलनाथ यांच्या खेम्यात अस्वस्थता आहे.
विवेक बंटी साहू यांना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभय आहे. त्यामुळे त्यांनी आक्रमक प्रचार करत आघाडी घेतली आहे. ‘छिंदवाडा का बेटा’ बनाम ‘कमलनाथजी का बेटा’ असे चित्र रंगविण्यात साहू यशस्वी ठरले.
२०१९ मध्ये काय घडले?
नकुल नाथ काँग्रेस (विजयी) ५,४७,३०५
नाथन शहा भाजप ५,०९,७६९
मनमाेहन शाह बट्टी एबीजीपी ३५,९६८
नोटा - २०,२३४
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के
२०१४ कमलनाथ काँग्रेस ५,५९,७५५ ५०%
२००९ कमलनाथ काँग्रेस ४,०९,७३६ ४९%
२००४ कमलनाथ काँग्रेस ३,०८,५६३ ४०%
१९९९ कमलनाथ काँग्रेस ३,९९,९०४ ६३%
१९९७ सुंदरलाल पटवा (पोटनिवडणूक) भाजप ३,४४,३०२ ५१%