एका दिवसात कमाविले १ कोटी २ लाख !
By admin | Published: November 7, 2016 10:25 PM2016-11-07T22:25:59+5:302016-11-07T22:25:59+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने रविवार ६ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १ कोटी २ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
धुळे, दि. 7 - राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने रविवार ६ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १ कोटी २ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. यामुळे धुळे विभाग राज्यात दुसऱ्या स्थानांवर पोहचला असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, उत्पन्न मिळविल्याचा इतिहासातील पहिलीच घटना असल्याचा दावाही त्यांनी केला़
यंदाच्या वर्षी दिवाळी सणाचे औचित्यसाधून काही मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते़ नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, पंढरपूर, सातारा, जळगाव, अहमदाबाद, बडोदा, सुरत, वापी आदी गावांकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता जादा बसेस सोडण्यात आले होते़
मध्यवर्ती कार्यालय
नियोजनानुसार मध्यवर्ती कार्यालयासाठी ५० बसला परवानगी देण्यात आली होती़ १९ हजार ९४ किमी इतके अंतर त्यासाठी निश्चित करण्यात आले होते़ मात्र ४६ बसेस या मार्गावर फिरविण्यात आलेल्या होत्या़ त्यात १७ हजार ९४४ किमी इतका प्रवास झाला़
प्रादेशिक कार्यालय
प्रादेशिक कार्यालयासाठी १७ बसला परवानगी देण्यात आली होती़ ६ हजार ६४६ किमी इतके अंतर त्यासाठी निश्चित करण्यात आले होते़ मात्र, १७ बसेस या मार्गावर फिरविण्यात आलेल्या होत्या़ ६ हजार ६४६ किमी इतका प्रवास झाला आहे़
आंतर राज्याची स्थिती
आंतर राज्यासाठी ५३ बसला परवानगी देण्यात आली होती़ ४० हजार ६११ किमी इतके अंतर त्यासाठी निश्चित करण्यात आले होते़ मात्र, ४८ बसेस या मार्गावर फिरविण्यात आलेल्या होत्या़ ३६ हजार ४३६ किमी इतका प्रवास करण्यात आलेला आहे़
२६ आॅक्टोबरपासून वेग
दिवाळीत जादा कालावधीत जनतेच्या सोईसाठी २२ आॅक्टोबर २०१६ पासून फेऱ्या चालविण्याची मंजूरी प्राप्त झालेली होती़ मात्र, शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्याने २६ आॅक्टोबरपासून जादा वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु झाली़ दरम्यान, धुळे विभागातील ९ आगारात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले़
>यंदाच्या वर्षी ३१ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली होती़ तत्पुर्वी २२ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत धुळे विभागाने ४५ लाख २१ हजार किमी इतके अंतर पूर्ण केले़ त्याद्वारे १२ कोटी १४ लाख इतके उत्पन्न मिळविण्यात आले आहे़ अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे़