सौदा १ कोटी ३५ लाखांत ?
By admin | Published: February 27, 2017 04:32 AM2017-02-27T04:32:50+5:302017-02-27T04:32:50+5:30
रविवारी घेतल्या जाणाऱ्या सैन्यभरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी रवींद्रकुमार याने संतोष शिंदे याच्यासोबत १ कोटी ३५ लाख रुपयांचा सौदा केला होता
नागपूर : देशातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी घेतल्या जाणाऱ्या सैन्यभरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी रवींद्रकुमार याने संतोष शिंदे याच्यासोबत १ कोटी ३५ लाख रुपयांचा सौदा केला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. हा पेपर व्हॉटस्अॅपवर मिळवल्यानंतर त्याबदल्यात उमेदवारांकडून ८ ते १० कोटी रुपये गोळा करण्याचे शिंदेचे मनसुबे होते.
संतोष शिंदे हा फलटण (जि. सातारा) येथे छत्रपती अकादमीच्या नावाखाली सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवतो. अशाच प्रकारे देशातील विविध प्रांतात सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या अनेक संचालकांसोबत शिंदेची ओळख आहे. रवींद्रकुमार लष्करात लिपिक असल्याचे शिंदेने पोलिसांना सांगितल्याचे समजते. त्यानेच लष्कराच्या शारीरिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे, पत्ते आणि संपर्क क्रमांक शिंदेला दिल्याचा संशय आहे. याच माहितीच्या आधारे शिंदे आणि इतरांनी उमेदवारांशी संपर्क केला.