परमार यांच्या मृत्यूप्रकरणातील आरोपीकडून आव्हाडांच्या खात्यात १ कोटी जमा
By admin | Published: December 1, 2015 12:57 AM2015-12-01T00:57:56+5:302015-12-01T09:10:14+5:30
ठाण्याचे प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले नगरसेवक नजीब मुल्ला खान यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र
मुंबई : ठाण्याचे प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले नगरसेवक नजीब मुल्ला खान यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी खळबळजनक माहिती सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. याप्रकरणी आव्हाड दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असेही राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले.
सूरज परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला व हनुमंत जगदाळे तर काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. अटकेच्या भीतीने या चौघांनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. अजय गडकरी यांच्यासमोर होती.
बचावपक्षांच्या वकिलांनी सोमवारी त्यांचा युक्तिवाद संपवला, तर सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी युक्तिवादास सुरुवात केली. ही गोल्डन गँग असून अन्य विकासकांकडून खंडणी वसूल करणे, हेच या चौघांचे काम असल्याचे न्या. गडकरी यांना अॅड. ठाकरे यांनी सांगितले. आपण लोकप्रतिनिधी म्हणून मृत व्यक्तीच्या (परमार) बेकायदेशीर कृत्यांबाबत महापालिकेमध्ये आवाज उठवला, असा या चौघांनीही दावा केला आहे.
ठाण्यात फार मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे असतानाही मृत व्यक्तीच्याच बांधकामांविरुद्ध सातत्याने आवज का उठवण्यात आला? या चौघांनीही ज्याप्रकारे त्यांच्या मागे हात धुवून लागली होती, त्यावरून त्यांचा हेतू सिद्ध होतो. तपासयंत्रणेने काही महत्वाच्या कॉल्सचे अॅनालिसीस केले आहे, त्यावरून हे चौघेही या घटनेशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले आहे, असे अॅड. ठाकरे म्हणाले.
परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये या चारही नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर ठाण्यातील बडे राजकीय पुढारीही त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी नोटद्वारे केला होता. मात्र आपल्या पश्चात कुटुंबियांना त्रास होऊ नये, यासाठी चारही नगरसेवकांची नावे खोडली तर राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख करणे टाळले.
नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एवढी मोठी रक्कम का आणि कशासाठी ट्रान्सफर करण्यात आली? याचीही चौकशी करायची आहे. ही रक्कम याच केससंदर्भात असेल तर सरकार संबंधित आमदारावरही कारवाई करेल, असेही अॅड. ठाकरे यांनी सांगितले.
तसेच विक्रांत चव्हाण,
हनुमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांच्याही आर्थिक व्यवहाराची चौकशी करायची असल्याने या सर्वांना पोलिसांच्या ताब्यात
देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. या याचिकांवर आता मंगळवारी सुनावणी होणार
आहे. (प्रतिनिधी)
संबंधित आमदारावर कारवाई होणार
तपासादरम्यान नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एवढी मोठी रक्कम का आणि कशासाठी ट्रान्सफर करण्यात आली? याचीही चौकशी करायची आहे. ही रक्कम याच केससंदर्भात असेल, तर सरकार संबंधित आमदारावरही कारवाई करेल, असेही अॅड. ठाकरे यांनी न्या. गडकरी यांना सांगितले.
परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये या चारही नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर ठाण्यातील बडे राजकीय पुढारीही त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी नोटद्वारे केला होता. मात्र आपल्या पश्चात कुटुंबीयांना त्रास होऊ नये, यासाठी चारही नगरसेवकांची नावे खोडली तर राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख करणे टाळले.