मुंबईत विदर्भ भवनासाठी १ कोटी!
By admin | Published: April 4, 2016 02:07 AM2016-04-04T02:07:39+5:302016-04-04T02:07:39+5:30
मुंबईत विदर्भ भवन उभारण्यासाठी बॉम्बे पोर्ट आणि जेएनपीटी आदींच्या माध्यमातून एक कोटी मिळवून देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिली
ठाणे : मुंबईत विदर्भ भवन उभारण्यासाठी बॉम्बे पोर्ट आणि जेएनपीटी आदींच्या माध्यमातून एक कोटी मिळवून देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिली. या भवनातून तरुणांना रोजगार आणि महिलांना त्यांच्या पायावर कसे उभे करता येईल, आदींविषयक मार्गदर्शन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
मुंबई-ठाणे विभागातील वैदर्भीय बांधवांचे २२ वे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी ठाण्याच्या गडकरी येथे पार पडले. संमेलनाचे उद्घाटक म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विदर्भभूषण म्हणून डॉ. राणी अभय बंग आणि भय्यूजी महाराज यांचा सत्कार केला. सत्कारमूर्तींना रोख एक लाख, स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच विदर्भ उद्योगश्री म्हणून मंगलजी चव्हाण आणि राम देवाणी यांनाही गडकरी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
> हा माहेरचा पुरस्कार - डॉ. राणी बंग
मी विदर्भाची कन्या आणि सून असून हा माहेरचा पुरस्कार असल्याचे गौरवोद्गार विदर्भभूषण डॉ. राणी बंग यांनी काढले. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाहीतर माझे पती अभय बंग, गडचिरोलीची जनता, संस्थेचे कार्यकर्ते आणि मार्गदर्शकांचा असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.