रेशनिंग दुकानावर साखरेतील काटा मारणे होणार बंद; सरकारनं शोधला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:39 AM2022-03-15T09:39:23+5:302022-03-15T09:39:49+5:30

शिधावाटप विभागाकडून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात एक किलो साखर वाटप केली जात आहे, पण मोजताना काटा मारला जात असल्यामुळे लाभार्थ्यास ती कमी मिळते, अशा तक्रारी वाढत आहेत

1 kg sugar packaging will be given to people at ration shops | रेशनिंग दुकानावर साखरेतील काटा मारणे होणार बंद; सरकारनं शोधला उपाय

रेशनिंग दुकानावर साखरेतील काटा मारणे होणार बंद; सरकारनं शोधला उपाय

googlenewsNext

ठाणे : शिधावाटप विभागाच्या रेशनिंग दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांना साखरेचे वाटप केले जात आहे. या एक किलो साखरेच्या वितरणात लाभार्थी कार्डधारकास साखर कमी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत, पण आता या तक्रारींना आळा घालण्यासाठी एक किलो साखर ग्राहकांना पॅकबंद देण्याचे नियोजन सरकारने केले आहे. त्यामुळे रेशनवरील साखरेला काटा मारणे बंद होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिधावाटप विभागाकडून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात एक किलो साखर वाटप केली जात आहे, पण मोजताना काटा मारला जात असल्यामुळे लाभार्थ्यास ती कमी मिळते, अशा तक्रारी वाढत आहेत. त्यास आळा घालण्यासाठी व लाभार्थ्यांना बरोबर एक किलो साखरेचे वितरण करण्यासाठी आता एक किलोच्या पॅकिंगमध्ये ती दिली जाणार आहे. तसा निर्णय होऊन कारवाई सुरू झाली आहे. गहू, तांदूळ, रॉकेल संबंधित लाभार्थ्यांना वाटप होत आहे. त्यानुसार आता साखरेचे वाटप अंत्योदय कार्डधारकांना होत आहे, पण त्यातही बहुतांशी दुकानदारांकडून ती मोजताना काटा मारला जात आहे. दुकानदारांच्या या मनमानीला आळा घालण्यासाठी एक किलो साखर पॅकिंगमध्येच वाटप करण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील रेशन दुकानात चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर, शाम्पू आदी वितरणाचा निर्णयही झालेला आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. या रेशनिंग दुकानदारांना जीएसटीसारख्या तांत्रिक मुद्याला तोंड देणे शक्य झालेले नाही. त्या आधी सवलतीच्या दरातील साखर एक किलो पॅकबंद वाटपाच्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र सुरू झाली आहे.

जिल्ह्यात १७८८ दुकानांतून साखरेचे वितरण

जिल्ह्यातील एक हजार ७८८ रेशनिंग दुकानांतून सवलतीच्या दरात अंत्योदय कार्डधारकांना साखर वाटप केली जात आहे. यामध्ये शहरातील एक हजार १९५ दुकानांसह ग्रामीणमधील ५९३ दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांना साखरेचे वाटप सुरू आहे.

एकेक किलोचे पॅकिंग

जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील ६९३ रेशनिंग दुकानांवर ४८ हजार ७६७ अंत्योदय कार्डधारक आहेत. त्यापैकी फेब्रुवारीमध्ये ३५ हजार २५६ कार्डधारकांना या एक किलो साखरेचे वाटप झाले आहे. आता त्यांना एक किलो पॅकिंमध्ये ती मिळणार आहे.

जिल्ह्यातील या अंत्योदय कार्डधारकांसाठी फेब्रुवारीअखेरीस व मार्चमध्ये साखरेची उचल झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीची साखर मार्चमध्ये या लाभार्थी कार्डधारकांना वाटप करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. - राजू थोटे. जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे.

ग्रामीणमधील कोणत्या तालुक्यात अंत्योदयच्या साखरेचे लाभार्थी

तालुका- अंत्योदय कार्डधारक- साखरेचे फेब्रुवारीतील लाभार्थी

अंबरनाथ - ४०७८ - ३४२१

भिवंडी - १२४७१ - ९३६४

कल्याण - २८५७ - १९३५

मुरबाड - ११२०२ - ८०८९

शहापूर - १८१५९ - १२४३७

Read in English

Web Title: 1 kg sugar packaging will be given to people at ration shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.