जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:53 AM2024-08-02T05:53:56+5:302024-08-02T05:54:55+5:30

पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले.

1 lakh 24 hectares affected by heavy rains in july in maharashtra | जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच

जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र कोकणासह विदर्भातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. पूरपरिस्थितीमुळे १ लाख २४ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. पुरात वाहून जाणे, वीज पडणे व इतर दुर्घटनांमध्ये तब्बल ९४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तीन हजारांहून अधिक पशूंचाही दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला. पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले.

मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा 

महिनाभरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे अद्यापही सर्वदूर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यात १७, जालन्यात २५, बीडमध्ये २७ जनावरे दगावली.  धाराशिवमध्ये २७४ घरांचे, तर पालघरमध्ये ३४१ घरांचे नुकसान झाले. दुर्घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ तर पालघरमध्ये ८ जणांचे मृत्यू झाले.

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

गंगाखेड (जि. परभणी) : तालुक्यातील महातपुरी शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. भगवान शिवाजी चव्हाण (३८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते एका झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी वीज कोसळली.

कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूच

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पातळीमध्ये गुरुवारी एका इंचाने वाढ झाली. परंतु पुन्हा दुपारनंतर ही पातळी कमी होऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ७३ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.    

ऑगस्ट महिन्यात देशभरात कसा असेल पाऊस?

पुणे : राज्यामध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. तर येत्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी दिला. ऑगस्टमध्ये देशात सरासरी पाऊस पडेल, काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी माॅन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसाचा अंदाज गुरुवारी जाहीर केला. ते म्हणाले, यंदा देशामध्ये जून आणि जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा १.८ टक्के अधिक राहिले आहे. तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १८.४ टक्के पाऊस झाला.  

जुलै महिन्यातील पावसामुळे झालेले नुकसान

जिल्ह्याची    बाधित शेती    किती      पशुधन     पुरातून बाहेर    मालमत्तांचे
स्थिती    हेक्टरमध्ये    झाले मृत्यू    दगावले     काढले     नुकसान 
नागपूर    २२८    १०    २८    २००    १४,५९१  
भंडारा    २३,२६०    ०४    ३३    २,७१९    २,९३७
गडचिरोली    १४,०७६    ०८    ६१    १८०    १,०६४
गोंदिया    २,८९५    ०५    २५    ००    १,३६८
चंद्रपूर    २३,८४६    ०५    ७०    ६७    २,९९५  
वर्धा    ११,१९४    ०१    २३    ०३    ६३३
बुलढाणा    १०,५४६    ००    ०४    ५९३    ९२  
यवतमाळ    ३,१००    ०७    ४६    ०२    ४१५
पुणे    ५७४.९१    ०९    १५    ४,४३५    १,०००
कोल्हापूर    २५,०००    ००    १३    ४६३    २,४५८
सांगली    ५,२२१    ०२    ००    ०४    ३११
रायगड    ७४६    ०४    १८    १,७४७    ५९६
रत्नागिरी    ३८१    ०५    १८    ०८    ७३३
सिंधुदुर्ग    ५००    ०३    ३,२००    ६२०    १,०५०
अकोला    ३,१४२    ०५    ००    ००    ४२
सातारा    ५४    ०४    १३    ००    २०७
अहमदनगर    ८२    ०१    ०६    ०२    ०७   
नंदुरबार    ८०    ०१    ११२    ००    ३८ 

 

Web Title: 1 lakh 24 hectares affected by heavy rains in july in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.