"महाराष्ट्रात 1 लाख कोटींचा घोटाळा"; बड्या नेत्यांची नावं घेत संजय राऊतांचा थेट मोदींना सवाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 05:59 PM2023-06-27T17:59:38+5:302023-06-27T18:01:01+5:30
"आमचा घोटाळा जर २० लाख कोटींचा असेल, तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटो सेशनमध्ये जमतात त्यांचा ५० लाख कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्रात १ लाख किटींचा आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मेरा बूथ सबसे मजबूत' या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जबरदस्त हल्ला चढवला. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा 'अश्वमेध' रोखण्यासाठी तब्बल 15 विरोधी पक्ष नुकतेच बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात एकत्रित आले होते. यावर बोलताना, "पाटण्यातील बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. तेथे जे विरोधक एकवटले होते, त्या सर्वांनी मिळून 20 लाख कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधा मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे.
"महाराष्ट्रात १ लाख किटींचा आहे" -
संजय राऊत म्हणाले, "आमचा घोटाळा जर २० लाख कोटींचा असेल, तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटो सेशनमध्ये जमतात त्यांचा ५० लाख कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्रात १ लाख किटींचा आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कूल, एक लाख कोटी, सर्व पुरावे दिलेले आहेत. पंतप्रधान यावर कारवाई करणार आहेत का? आणि मग त्यांनी आमच्यावर टीका करावी. पार्लमेंट का चालू शकली नाही? कारण आम्ही भष्टारासंदर्भात प्रश्न केले आणि आपण त्यापासून पळून गेलात. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला जे प्रश्न विचारले. यावर आपण उत्तर दिले आहे का? हे फोटो सेशन आणि विरोधी पक्षांवर टीका करणे सोपे आहे. याची उत्तरं 2024 ला मिळतील."
काय म्हणाले मोदी -
विरोधकांना लक्ष्य करत मोदी म्हणाले, "पाटणाच्या बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. घोटाळाविरोधी कारवाईतून विरोधी पक्ष पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्ट नेते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला हमी देतो की, मी त्यांच्यापैकी कुणालाही सोडणार नाही आणि प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई करेन. जर विरोधकांकडे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर माझ्याकडेही तुम्हा सर्वांसाठी एकच गॅरंटी आहे आणि ती म्हणजे भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांना मी सोडणार नाही. आज जेव्हा त्यांच्यावर कारवाई होत आहे, हे पाहून ते एकत्र आले आहेत."
"पाटण्यात एकत्र आलेल्या सर्व पक्षांनी मिळून 20 लाख कोटी रूपयांचा घोटाळा केला" -
मोदी म्हणाले, पाटण्यात जे विरोधक एकवटले होते, त्यांची यादी केली तर सर्व पक्षांनी मिळून एकूण 20 लाख कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तसेच एकट्या कॉंग्रेस पक्षाने लाखो कोटींचा घोटाळा केला, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर 70 कोटी रूपयांचा घोटाळा असल्याचा आरोप असून त्यांचीही यादी मोठी असल्याचे मोदी म्हणाले.