१ मे रोजीच भाजपाची शिवसेनेवर कुरघोडी
By Admin | Published: May 2, 2016 01:03 AM2016-05-02T01:03:49+5:302016-05-02T01:03:49+5:30
मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपाने चांगलेच धोबीपछाड दिले. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपाने मुंबईभर धडाक्यात महाराष्ट्र दिनाचा
- गौरीशंकर घाळे, मुंबई
मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपाने चांगलेच धोबीपछाड दिले. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपाने मुंबईभर धडाक्यात महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा केला. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात भाजपाने आक्रमकपणे कार्यक्रमांची आखणी करत शिवसेनेला अक्षरश: बाजूला सारले.
दरवर्षी शिवसेनेच्या शाखा आणि विभागांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा होतो. चौकाचौकांत फडकणारे भगवे ध्वज, रोशणाई, छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक पद्धतीने सजविलेला पुतळा आणि त्याजोडीला सत्यनारायण वगैरे पूजा असा दरवर्षीचा शिवसेना स्टाईल उत्सव यंदा अभावानेच पाहायला मिळाला. त्याउलट भाजपाने मात्र आधीपासूनच जोरदार आघाडी उघडली. महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर भाजपाचे झेंडे लावण्यात आले. बस स्टॉपपासून उड्डाणपुलांवर स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचे होर्डिंग झळकत होते. मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचा संदेश या होर्डिंगद्वारे देण्यात आला. राज्य आणि केंद्र सरकारच्या विकासकामांची या माध्यमातून जोरदार प्रसिद्धी करण्यात आली. मुंबईतील एकूण २२७ वॉर्डांतून कार्यक्रम करण्याची योजनाबद्ध आखणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी स्थानिक पातळीपर्यंत आवश्यक ती सर्व ‘रसद’ पोहोचेल याची खास व्यवस्था करण्यात आली. शिवसेनेला कसलीच संधी मिळणार नाही याची पुरेपूर दक्षता या वेळी घेण्यात आली. शहरात भाजपाकडून ५००च्या वर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात वैद्यकीय शिबिरे, फळेवाटप, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांची रेलचेल होती.