पंधरा वर्षे वयाच्या १० लाख गाड्या; फिटनेसची खात्री द्यायची कोणी..?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:25 AM2022-04-16T06:25:43+5:302022-04-16T06:26:00+5:30
मुंबई महानगरात आताच्या घडीला सुमारे ९० लाख वाहनांची नोंदणी झालेली आहे. संपूर्ण प्रदेशातील वाहनांपैकी ३२ लाख वाहने ही पंधरा वर्षे पूर्ण केलेली आहेत.
मुंबई/ठाणे :
मुंबई महानगरात आताच्या घडीला सुमारे ९० लाख वाहनांची नोंदणी झालेली आहे. संपूर्ण प्रदेशातील वाहनांपैकी ३२ लाख वाहने ही पंधरा वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यापैकी किमान १० लाख वाहने रस्त्यावर असून, या वाहनांच्या फिटनेसबाबत खात्री देता येईल, अशी माहिती परिवहन विभागाकडे उपलब्ध नाही. वाहनांच्या फिटनेसबाबत परिवहन विभाग वारंवार तपासणी मोहिमा हाती घेत असले तरी सुरक्षित प्रवासाची हमी देता येईल अशी ठोस माहिती कोणाकडेही उपलब्ध नाही.
मुंबई महानगर क्षेत्रात २००७ मध्ये ३२ लाख १३ हजार वाहनांची नोंद झाली होती. या वाहनांची पंधरा वर्षांची मुदत पूर्ण झाली आहे. त्यापैकी किमान १० लाख वाहने रस्त्यावर असावीत, असा वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मुंबई-ठाण्यात वाहनांच्या फिटनेसबाबत जागरूकता दिसते. परंतु, उर्वरित महानगर क्षेत्रात, मुदत संपलेली वाहने चालविण्याचे प्रमाण जास्त आहे. सार्वजनिक सेवा देणारी मुदत उलटून गेलेली वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत. मुदतवाढीसाठी पुनर्नोंदणी शुल्क न भरताच वाहने दामटविण्याकडे वाहनचालक-मालकांचा कल असतो, असे वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याने सांगितले.
पाच वर्षे मिळतात वाढवून...
वाहन १५ वर्षे जुने झाले की, पर्यावरण कर भरून ते वाहन आणखी पाच वर्षे चालविता येते. त्यासाठी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र आरटीओकडून घ्यावे लागते. असे प्रमाणपत्र देताना संबंधित वाहनाची तपासणी आरटीओ अधिकारी करतात. याशिवाय रस्त्यावर धावणारी वाहने तांत्रिकदृष्ट्या सक्षम आाहेत अथवा नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी आरटीओची वायूवेग पथके कार्यरत असतात. वाहने असे प्रमाणपत्र देण्याच्या याेग्यतेची नसतात किंवा अपघातांमुळे जी वाहने दुरुस्त करण्यासारखी नसतात अशी वाहने भंगारात काढली जातात.
कारवाई सुरू आहे...
केंद्र सरकारने स्क्रॅप पॉलिसी आणली आहे. तुम्ही स्वेच्छेने वाहने मोडीत काढू शकता. १५ वर्षांनंतर राज्य सरकारचा पर्यावरण कर लागतो. तसेच फिटनेस करणे आवश्यक आहे. फिटनेस शुल्क वाढविण्यात आले आहे. १५ वर्षे जुन्या गाड्या चांगल्या असतील तर पर्यावरण कर, पुनर्नोंदणी आणि फिटनेस शुल्क भरून वापरता येतात. मात्र, फिटनेसशिवाय गाड्या वापरणाऱ्यांवर कारवाई कायम सुरू असते.
वय नव्हे, फिटनेस महत्त्वाचा !
केवळ १५ वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आहेत म्हणून रस्ता सुरक्षेवर परिणाम होत नाही. रस्ते अपघाताला वाहनांची गती हे मुख्य कारण असते. रस्त्यावर नव्या वाहनांची संख्या जास्त असून, जुनी वाहने त्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे, रस्ता सुरक्षेसाठी वाहनाचे वय नव्हे, तर फिटनेस महत्त्वाचा आहे. गतीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे.
- रणजित गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ
वाहन प्रकार
मोटारसायकल, स्कुटर, मोपेड, गाड्या, जीप, स्टेशन व्हॅगन, लक्झरी कॅब, रिक्षा, स्टेज कॅरेजेस, मिनी बस, शाळेच्या बसेस, खासगी सेवा वाहने, रुग्णवाहिका, ट्रक-लॉरी, टँकर, चारचाकी डिलिव्हरी वाहने, तीन चाकी डिलिव्हरी वाहने, ट्रॅक्टर, ट्रेलर्स, आदी उपस्थित होते.
- अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त