समृद्धी महामार्गाला कुंभमेळा पावला, फेब्रुवारीत १० लाख वाहनांनी केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:42 IST2025-03-22T14:41:49+5:302025-03-22T14:42:39+5:30
नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासांत पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्ग उभारण्यात आला. या द्रुतगती मार्गाचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले...

समृद्धी महामार्गाला कुंभमेळा पावला, फेब्रुवारीत १० लाख वाहनांनी केला प्रवास
मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीत तब्बल १० लाख ४२ हजार वाहनांनी प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाहन संख्या असून, कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गाचा वापर केल्याने प्रवासी संख्येत ही वाढ झाली. त्यातून एका महिन्यात टोलद्वारे सुमारे ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत जमा झाले.
नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासांत पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्ग उभारण्यात आला. या द्रुतगती मार्गाचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले. तेव्हापासून १५ मार्च २०२५पर्यंत या महामार्गावरून १,८५,२६,३३७ वाहनांनी प्रवास केला आहे. त्यातून एमएसआरडीसीला आतापर्यंत १३०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सद्य:स्थितीत या महामार्गावरून दरमहा सरासरी ३० हजार वाहने धावतात. फेब्रुवारीत आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा १०,४२,१७१ वाहनांनी प्रवास केला. येत्या महिनाभरात समृद्धीचा शेवटचा टप्पा प्रवाशांच्या सेवेत येईल.
कोणत्या महिन्यात
किती वाहने धावली?
सप्टेंबर २०२४ ७,६३,७६२
ऑक्टोबर २०२४ ७,८५,२५६
नोव्हेंबर २०२४ ९,१४,४४१
डिसेंबर २०२४ १०,००,६५९
जानेवारी २०२५ ९,६७,७२२
फेब्रुवारी २०२५ १०,४२,१७१
१,८५,२६,३३७ एकूण