ठाकरेंच्या १६ पैकी १ आमदार साथ सोडणार? शिंदेंसोबत गुप्त बैठक, काय चर्चा झाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:18 PM2024-02-08T18:18:43+5:302024-02-08T18:19:04+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु होणार आहेत. अनेक नेते राजकीय समीकरणे बांधून काठावर बसले आहेत. राष्ट्रवादीचे काही ...
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु होणार आहेत. अनेक नेते राजकीय समीकरणे बांधून काठावर बसले आहेत. राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवारांवर नाराज असल्याने ते आपल्याकडे परत येतील असा दावा शरद पवार गटाने केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांना आपले दरवाजे कायमचे बंद केल्याची घोषणा उद्धव ठाकरे करून बसले आहेत. अशातच शिंदेंनी मात्र ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडेच ठेवले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिलेले १६ पैकी एक आमदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे वृत्त येत आहे. या आमदाराने काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार हा आमदार लवकरच शिंदे गटाची वाट धरण्याची शक्यता आहे.
आपापला मतदारसंघ कोणाला सुटतो यावर बरीच पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. यात विरोधक कोण असणार यावरही या नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षातील उड्या अवलंबून असणार आहेत. अशातच या आमदाराने शिंदेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे.
मुळचा शिवसैनिक असून, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. येत्या लोकसभेला खांद्याला खांदा देऊन लढण्याची इच्छा या आमदाराने व्यक्त केली आहे. अद्याप या आमदाराविषयी माहिती समोर आलेली नाहीय. परंतु, लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.