१ हजार औरंगाबादकर झाली विशेष पोलीस अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 07:41 PM2017-09-04T19:41:22+5:302017-09-04T19:48:10+5:30
शहर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुढे आलेल्या सात हजार लोकांमधून निष्कलंक एक हजार नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. उत्कृष्ट काम करणा-या विशेष पोलीस अधिका-यांना शस्त्र परवान्यासह सुरक्षा एजन्सी परवाना देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले.
औरंगाबाद, दि. 4 : शहर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुढे आलेल्या सात हजार लोकांमधून निष्कलंक एक हजार नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. उत्कृष्ट काम करणा-या विशेष पोलीस अधिका-यांना शस्त्र परवान्यासह सुरक्षा एजन्सी परवाना देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले.
तापडिया नाट्यमंदिर येथे नवनियुक्त एक हजार विशेष पोलीस अधिका-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्यासह अन्य अधिका-यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त म्हणाले की, विशेष पोलीस अधिका-यांचे कर्तव्य आणि कामाची पद्धत कशी असेल, याबाबतची माहिती त्यांनी दिली. ज्या ठाण्यांतर्गत तुमची नियुक्ती आहे, त्या ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी जर कोणतेही काम करण्यासाठी पैशाची मागणी करीत असेल तर त्याबाबतची तक्रार तुम्ही थेट आपल्या मोबाईलवर व्हॉटस्अॅपद्वारे करा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष पोलीस अधिका-यांनी रोज दोन तास पोलिसांसाठी देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विशेष पोलीस अधिका-यांना जॅकेट, लाठी आणि सिटीचे वाटप करण्यात आले.
देवगिरी मैदानावर प्रशिक्षण
नवनियुक्त विशेष पोलीस अधिका-यांना पोलीस मुख्यालयाच्या देवगिरी मैदानावर पोलीस निरीक्षक राजेंद्र कत्तुल यांनी सुमारे एक तास प्रशिक्षण दिले. यावेळी उपस्थितांकडून सॅल्युट कसा मारावा, सावधान, विश्राम उभे राहणे, सिटी वाजविण्याचे विविध प्रकार याविषयी प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
एका तरुणीला आली भोवळ
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस निरीक्षक कत्तुल हे विशेष पोलीस अधिका-यांना शिस्तीचे महत्त्व विशद करून सांगताना पोलीस खात्यातील महत्त्वाच्या टिप्स देत होते. यावेळी विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या तरुणीला परेडदरम्यान भोवळ आली. यामुळे तिला महिला पोलिसांनी उचलून बाजूला नेऊन बसविले.