सात महिन्यात १ हजार लाचखोर गजाआड
By admin | Published: August 2, 2015 03:12 AM2015-08-02T03:12:03+5:302015-08-02T03:12:03+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावर्षी आतापर्यंत तब्बल एकूण ७५३ गुन्हे दाखल करुन १ हजार १० जणांना गजाआड केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्कयांनी अधिक आहे.
मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावर्षी आतापर्यंत तब्बल एकूण ७५३ गुन्हे दाखल करुन १ हजार १० जणांना गजाआड केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्कयांनी अधिक आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकांनी गप्प न राहता तात्काळ समोर येण्याचे आवाहन लाच लुचपत विभागाने वेळोवेळी केले आहे. याचाच परिणाम म्हणून यावर्षी अवघ्या सात महिन्यात(३१ जुलैपर्यंत) एसीबीने ७२४ सापळे रचून लाच मागणाऱ्या स्वीकारणाऱ्या एकूण ९३२ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना गजाआड केले. यात काही खासगी व्यक्ती, लोकप्रतिनी, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकीलांचाही समावेश आहे. यासोबत एसीबीने अन्य भ्रष्टाचाराचेही २९ गुन्हे नोंदवून त्यात एकूण ३८ जणांना बेडया ठोकल्या आहेत.
लाच घेताना जाळ्यात सापडलेले सर्वाधिक म्हणजे २२९ लाचखोर हे महसूल विभागाचे आहेत. पोलीस हे भ्रष्टाचारात दुसऱ्या क्रमांकावर असून २०६ पोलिसांना लाच घेताना थेट अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ लाचखोरांमध्ये ग्रामविकास१३३, नगर विकास विभाग ५५, शिक्षण विभाग ४३ , आरोग्य विभाग २८, विद्युत महामंडळ ४०, पाटबंधारे विभाग ७, वन विभाग २४ आणि सहकार व पणन विभाग ११यांचा समावेश आहे.
या कारवाईत तलाठी ९६, अभियंता ३५, शिक्षक २८, डॉक्टर १४, वकील ५, सरपंच ७, नगरसेवक २,सभापती ३ या लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे. या सापळळ्यांदरम्यान एसीबीने त्यांच्याकडून १ कोटी ६७ लाख २५ हजार ९६३ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. अपसंपदा प्रकरणी १० कोटी ३ लाख ८८ हजार ८२२ इतकी रक्कम जप्त केली आहे.