गरिबांसाठी प्रत्येक श्रेणीत १०% खाटा, धर्मादाय रुग्णालयांची कार्यप्रणाली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:42 AM2023-06-24T06:42:33+5:302023-06-24T06:42:53+5:30
या खात्याचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कार्यप्रणाली निश्चित करण्याचे निर्देश दिले होते
मुंबई : आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकांसाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये खाटांच्या १० टक्के नव्हे तर प्रत्येक श्रेणीतील १० टक्के खाटा राखीव असतील, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदर्श कार्यप्रणालीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
या खात्याचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कार्यप्रणाली निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वैद्यकीय मोफत उपचाराकरिता निर्धन व्यक्तींना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १ लाख ८० हजार रुपये इतकी तर दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय योजनेनुसार ५० टक्के सवलतीच्या दराने उपचाराकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ३ लाख ६० हजार रुपये असेल. ही माहिती धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात तसेच ओपीडी/आयपीडीच्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रसिद्ध करावी.
आरोग्य सेवकाची नेमणूक
रुग्णांना धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अनुषंगाने मदत मिळणे सुलभ व्हावे, याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात येत आहे. रुग्णांना योजनेची माहिती उपलब्ध करून त्यांना त्यांच्या हक्काची रुग्णसेवा मिळवून देण्यास मदत करण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य सेवकांवर सोपविण्यात आली आहे.