मध्य रेल्वेवर धावणार १0 बम्बार्डियर लोकल?
By admin | Published: November 5, 2016 04:52 AM2016-11-05T04:52:56+5:302016-11-05T04:52:56+5:30
पश्चिम रेल्वेवर नव्या बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्याने दाखल होत असतानाच यापासून मध्य रेल्वे वंचित राहिली
मुंबई : पश्चिम रेल्वेवर नव्या बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्याने दाखल होत असतानाच यापासून मध्य रेल्वे वंचित राहिली होती. मात्र बम्बार्डियरचा अनुभव मध्य रेल्वे प्रवाशांनाही मिळावा यासाठी सुमारे १० नव्या लोकल ताफ्यात आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. परंतु ट्रॅकची कमी असलेली क्षमता यामुळे नव्या बम्बार्डियर लोकलपासून हार्बर व ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर वंचितच राहणार असल्याची शक्यता
आहे.
एमआरव्हीसीमार्फत (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एयूटीपी-२ अंतर्गत ७२ बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्यात पश्चिम रेल्वेवर आणल्या जात आहेत. तत्पूर्वी ७२ बम्बार्डियर लोकल मुंबईत टप्प्याटप्प्यात दाखल करतानाच त्यापैकी ४0 लोकल या मध्य रेल्वेच्या वाट्याला होत्या तर ३२ पश्चिम रेल्वेसाठी होत्या. मात्र नव्या लोकल स्थिर होर्इंपर्यंत मध्य रेल्वेवर मोठ्या तांत्रिक समस्या उद्भवतील अशी कारणे पुढे करत या लोकल मध्य रेल्वेकडून नाकारण्यात आल्या. मार्च २0१५मध्ये पहिली बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेवर धावली. ही लोकल धावण्यासही एक वर्ष लागले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने नव्या लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ७२पैकी ५८ लोकल पश्चिम रेल्वेकडे दाखल झाल्या आहेत. उरलेल्या किमान १० लोकल मध्य रेल्वेला मिळाव्यात यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले. या लोकल आल्यास त्या मेन लाइनवरच चालविल्या जातील.
महत्त्वाची बाब म्हणजे मेन लाइनच्या ट्रॅकची क्षमता ही ताशी १0५ किलोमीटरपर्यंत वेग सहन करण्याची आहे. तर हार्बर, ट्रान्स हार्बरवरील ट्रॅकची क्षमता ताशी ८५ किमीपर्यंत आहे.
हार्बर, ट्रान्स हार्बरवर सिमेन्स कंपनीच्या लोकल धावत असल्या तरी ट्रॅक क्षमतेत त्या ‘फिट’ ठरल्या आहेत. मात्र बम्बार्डियर लोकल त्यात समाविष्ट करणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. तरीही त्याची पडताळणी केली जात आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४४ लोकल आहेत. परंतु यापैकी १२२ लोकलच मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बरवर चालविल्या जातात. (प्रतिनिधी)
>धावणाऱ्या १२२ लोकल
भेल - ५ लोकल
सिमेन्स - ८९ लोकल
रेट्रोफिटेड - २८ लोकल
म.रे.च्या १६६0 फेऱ्या
मेन लाइनवर - ८३८ फेऱ्या
हार्बरवर - ५९0 फेऱ्या
ट्रान्स हार्बरवर - २३२ फेऱ्या
>हार्बर व ट्रान्स हार्बरवर १२२पैकी ४६ लोकल धावतात. यातही १८ लोकल सिमेन्स कंपनीच्या आहेत.