काँग्रेसचे १० आमदार सेनेच्या टप्प्यात?
By admin | Published: June 12, 2014 04:33 AM2014-06-12T04:33:37+5:302014-06-12T04:33:37+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर जोमात आलेल्या भाजपा-शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही विद्यमान आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
अतुल कुलकर्णी , मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर जोमात आलेल्या भाजपा-शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही विद्यमान आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेने राज्यातील दहा असे आमदार हेरून ठेवले असून त्यांना आमदारकीच्या तिकीटासोबतच निवडून आणण्यासाठीची रसद देखील पुरवली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे पानीपत झाले. त्यामुळे विदर्भातील या दोन पक्षाचे आमदार आत्ताच हवालदिल झाले आहेत. नांदेड-हिंगोली सोडले तर तीच अवस्था मराठवाड्याची आहे. सेनेने काँग्रेसच्या ज्या आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे त्या जागा भाजपाच्या वाट्याच्या आहेत. शिवसेनेने काँग्रेसच्या मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. तर भाजपाने राष्ट्रवादीचे आमदार हेरणे सुरू केले आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील नाराज आमदारांची पहिली पसंती भाजपा आहे. मात्र मतदारसंघांमधील स्थानिक गणिते लक्षात घेऊन काही नाराज काँग्रेस आमदारांनी शिवसेनेकडे कल दाखवला आहे. या दहा आमदारांचे नेतृत्व कोण करीत आहे, याविषयी कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
वाट्याला आलेल्या पण भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस निवडून आलेल्या जागा शिवसेनेच्या टप्प्यात आहेत. उद्या शिवसेनेला दूर करण्याची भूमिका भाजपाने घेतलीच तर भाजपाच्या विरोधात हे हत्यार वापरायचे, असाही यामागे दूरगामी विचार आहे. भाजपा आज जरी राज्यातल्या अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर दिसत असली तरी भाजपाने आत्तापर्यंत तीन सर्व्हे करुन घेतले आहेत. त्यात अ, ब, क असे तीन गट पाडले आहेत. सर्व्हेमध्ये ज्यांना ‘अ’ गट मिळालेला आहे त्या जागी भाजपा स्वत:ची महत्वाची माणसे उभे करेल. ‘ब’मध्ये दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे तर जे मतदारसंघ ‘क’ दर्जात आहेत त्या जागा महायुतीत मित्र पक्षांना सोडण्याची तयारी भाजपाने केली आहे. रामदास आठवले आणि विनायक मेटे यांची जबाबदारी शिवसेनेने घ्यायची तर महादेव जानकर, राजू शेट्टी यांची जबाबदारी भाजपाने घ्यायची अशी विभागणी गोपीनाथ मुंडे असताना झालेली होती.
आठवले यांना शिवसेनेने महायुतीत आणले मात्र भाजपाने खासदारकी दिली. आता त्यांचे मंत्रीपद शिवसेनेच्या कोट्यातून दिले जावे असा भाजपाचा आग्रह आहे.