महावितरण अधिकाऱ्यास १० दिवसांची शिक्षा
By admin | Published: April 27, 2016 06:29 AM2016-04-27T06:29:15+5:302016-04-27T06:29:15+5:30
न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला : रोहित्रासाठी ग्राहकाने केलेल्या खर्चाची परतफेड करताना, दोन शून्य जास्त लावून महावितरणचा तोटा करणाऱ्या तसेच यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या अधिकाऱ्याची वैयक्तिक संपत्ती जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
विद्युतपुरवठ्यासाठी अकोला एमआयडीसीमधील न्यू दिनार ट्रेडिंग कंपनीने महावितरणकडे अर्ज केला होता. त्यासाठी रोहित्र आवश्यक असल्याने, रोहित्राचा खर्च आधी कंपनीने स्वत: करावा आणि नंतर देयकातून महावितरण त्याची प्रत्येक महिन्यात कंपनीला परतफेड करेल, असे ठरले होते. त्यानुसार कंपनीने रोहित्रासाठी २ लाख ७१ हजार ७९६ रुपये खर्च केले आणि हा खर्च महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमा करताना २ लाख ७१ हजार ७९६ रुपयांऐवजी त्यावर दोन शून्य वाढवले. त्यामुळे कंपनीच्या खात्यात २ कोटी ७१ लाख ७९ हजार ६०० रुपये जमा करण्याचे रेकॉर्डवर आले. या रकमेची प्रत्येक महिन्यात परतफेड करीत असताना, महावितरणच्या लक्षात ही चूक आली, तोपर्यंत न्यू दिनार कंपनीला तब्बल १८ लाख ५६ हजार ८०६ रुपये जास्त दिल्याचे उघड झाले.