शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:00 AM2023-01-14T00:00:17+5:302023-01-14T00:00:26+5:30
या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.
अंबरनाथ : मोरीवली येथून काल रात्री शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या एका बसला पहाटेच्या सुमारास, नाशिक जिल्यातील घोटी सिन्नर महामार्गावर असलेल्या पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.
अंबरनाथ जवळील मोरीवली येथील काही रहिवासी गुरुवारी रात्रीच्या सुमारास, एकूण 15 बसेसनी शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातीलच एका बसला घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ अपघात झाला. या अपघातात मोरीवलीतील बारस्कर आणि उबाळे कुटुंबांवर काळाने घाला घातला. या अपघातात या दोन्ही कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
पत्नीचा हट्ट अन् काळाचा घाला -
नरेश उबाळे यांच्या पत्नी वैशाली यांना शिर्डी येथे देवदर्शनाला जाण्यासाठी पासेस मिळाले होते. यानंतर त्यांनी पती नरेश यांच्याकडे साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी हट्ट धरला होता. यावर नरेश यांनी पत्नीच्या हट्टामुळे सुट्टी घेतली आणि ते पत्नी वैशाली, मुलगी निधी व मधुरा यांच्यासह शिर्डीला निघाले. मात्र, या प्रवासादरम्यान बसला झालेल्या भीषण अपघातात नरेश उबाळे आणि त्यांची पत्नी वैशाली उबाळे यांचा मृत्यू झाला. तर 9 वर्षीय निधी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरेश हे एका वाईन शॉपमध्ये नोकरी करत होते. त्यांना 3 मोठे भाऊ असून त्यांच्या घरातील एकूण 17 जण देवदर्शनासाठी गेले होते.
बारस्कर कुटूंबातील दोन जणांचा मृत्यू
याशिवाय, सुहास बारस्कर त्यांची पत्नी आणि दोन मुलीही याच याच बसमध्ये होत्या. या अपघातात बारस्कर यांच्या पत्नी श्रद्धा आणि मुलगी श्रावणी यांचा मृत्यू झाला आहे. तर सुहास आणि मोठी कन्या शिवन्या हे सुदैवाने बचावले आहेत.
याच बरोबर, मोरीवली गावातील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीचे मालक गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी आणि परिचयातील व्यक्तींना शिर्डी येथे देवदर्शनासाठी मोफत घेऊन जातात, असे स्थानिकांनी म्हटले आहे.