२ आॅक्टोबर रोजी १0 तासांचा ब्लॉक
By admin | Published: September 25, 2016 01:13 AM2016-09-25T01:13:00+5:302016-09-25T01:13:00+5:30
दिवा स्थानकात डाऊन लोकल मार्गावर कट-कनेक्शन काम केले जात असून या कामांसाठी २ आॅक्टोबर रोजी दहा तासांच्या ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. १६ आणि २३ आॅक्टोबर
मुंबई : दिवा स्थानकात डाऊन लोकल मार्गावर कट-कनेक्शन काम केले जात असून या कामांसाठी २ आॅक्टोबर रोजी दहा तासांच्या ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. १६ आणि २३ आॅक्टोबर रोजीही ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दिली.
दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्याची दखल घेत एमआरव्हीसीकडून जलद लोकलसाठी प्लॅटफॉर्म बांधण्याचा निर्णय झाला. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून कामही केले जात आहे. अखेरच्या कामात रुळांचे काम करतानाच काही प्लॅटफॉर्मची कामे केली जात आहेत. त्यासाठी प्रत्येक रविवारी चार मोठ्या ब्लॉकचे नियोजन केले होते आणि यातील दहा तासांचा पहिला मोठा ब्लॉक १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहापर्यंत घेण्यात आला. मात्र संध्याकाळी पाऊण तास अगोदरच ब्लॉकचे काम पूर्ण करण्यात आले. या ब्लॉकनंतर आणखी तीन ब्लॉकचे नियोजन रविवारी करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दिली. २ आॅक्टोबर आणि त्यानंतर १६ व २३ आॅक्टोबर रोजी ब्लॉक घेण्यात येईल, असे गोयल यांनी सांगितले. यातील २ आॅक्टोबरला घेण्यात येणारा ब्लॉक हा दहा तासांचा असेल, तर त्यानंतरचे ब्लॉकही साधारणपणे दहा तासांचे घेण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)