मोठी बातमी! म्हाडा योजनेत पोलिसांसाठी १० टक्के घरं आरक्षित; ठाकरे सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 08:26 PM2022-04-01T20:26:50+5:302022-04-01T20:27:57+5:30
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा, म्हाडाच्या योजनेत पोलिसांसाठी दहा टक्के घरे आरक्षित
जळगाव : उन्हा - तान्हात आणि कोरोना काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांसाठी म्हाडाच्या सर्व योजनांमध्ये दहा टक्के घरे आरक्षित केली जातील, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी फैजपूर येथे केली.
एका खाजगी कार्यक्रमासाठी आव्हाड हे शुक्रवारी फैजपूर (ता. यावल) येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, गृहनिर्माण विभागातर्फे तालुका तिथे म्हाडा योजना राबविण्यात येणार आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस बांधवांचे मृत्यू झाले आहेत. अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी म्हाडाच्या योजनेत दहा टक्के आरक्षण ठेवण्यात येईल. तसेच पुणे (धानोरी) येथे ५२ एकर जमिन घेतली आहे. त्यात सुद्धा पोलिसांना पाच टक्के कोटा देण्यात येईल. अल्पसंख्यांक मंत्री म्हणून मदरसा व मशिदीसाठी तर निधी दिला जातो, मात्र शाळांसाठी निधी मागा, असे उपस्थितांना सांगत अल्पसंख्यांक समाज शिक्षणामुळे मागे राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.