विजेत्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये - चंद्रशेखर बावनकुळे; लोकमत सरपंच अवॉर्ड्सचे थाटात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:23 AM2018-02-17T01:23:50+5:302018-02-17T01:24:12+5:30
केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा आहे. गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाºया सरपंचाचा ‘लोकमत’ने सत्कार केला.
नागपूर : केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा आहे. गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाºया सरपंचाचा ‘लोकमत’ने सत्कार केला. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या सरपंचांच्या ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली.
लोकमत समूहातर्फे शुक्रवारी गांधीसागर तलाव महाल येथील रजवाडा पॅलेस येथे ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ची घोषणा व वितरण करण्यात आले.
या वेळी नागपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट १३ सरपंच तसेच संपूर्ण वर्गवारीत उत्कृष्ट काम करणाºया एका सरपंचाला ‘सरपंच आॅफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा होते.
विदेशातील लोकांचा गावातच राहण्यावर भर असतो. येथे मात्र लोक गाव सोडून शहरात येत आहेत. कारण गावांमध्ये रोजगार आणि सोई-सुविधा नाही. त्यामुळे शहरे वाढत असून गावे भकास होत आहेत. शहरात झोपडपट्ट्यांची समस्या वाढत आहे. हे चित्र बदलण्याची क्षमता ग्रामपंचायतीमध्ये आहे. ग्रामपंचायत सरपंच चालवतात.
त्यामुळे सरपंचाची भूमिका ही सर्वांत महत्त्वाची आहे. गावातच रोजगार व सुविधा मिळाल्या, चांगल्या शाळा, शिक्षक, स्वच्छ पाणी व शौचालय, चांगले रस्ते तयार झाले तर गाव सोडून कुणीही शहरात जाणार नाही, असा विश्वास विजय दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.