सोन्याच्या दोन बिस्कीटासह १० लाखांचा ऐवज जप्त
By Admin | Published: December 29, 2016 09:16 PM2016-12-29T21:16:29+5:302016-12-29T21:16:29+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी सोन्याच्या दोन बिस्कीटासह तीन व्यक्तींना अटक केली
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 29 - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी सोन्याच्या दोन बिस्कीटासह तीन व्यक्तींना अटक केली. ते इसम तेलंगणा येथील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश कृष्णमूर्ती यासमनी (जमीकुठा, करिमनगर), सुरेश व्यंकटेशम उटनुर (आसीफाबाद) आणि सलाउद्दीन उर्फ सलीम बशिरऊद्दीन शेख (आसीफाबाद) अशी त्यांची नावे आहेत. बसस्थानकासमोरील जिल्हा उद्योग केंद्रासमोर एक लाला रंगाची मारोती स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए. टी. राठोड यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता तीन व्यक्ती वाहनामध्ये बसलेले दिसले. त्यांची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागल्याने संशय बळावला. त्यामुळे कारची झडती घेतली असता सोन्याची दोन बिस्कीटे आढळून आली. त्यासंदर्भात ते काहीही सांगू शकले नहेत. यावरून या तिघांनाही कार व बिस्कीटासह ताब्यात घेऊन कारवाई केली. बिस्कीटे प्रत्येकी २०० ग्रॅमची असून सहा लाख रूपये किंमतीची आहेत. या सोबतच दोन मोबाईल, कार असा एकूण १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.