सुनिल कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 09:05 PM2023-10-19T21:05:03+5:302023-10-19T21:05:58+5:30
कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एका व्यक्तीने आत्महत्या केली. सुनील बाबुराव कावळे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला वेगळे वळण लागले आहे. या आत्महत्या प्रकरणामुळे आरक्षणाच्या मुद्द्याने अजून जोर धरला लागला. दरम्यान, सरकारच्या वतीने मंत्री दीपक केसरकर यांनी याप्रकरणावर भाष्य केले. त्यांनी सुनिल कावळे यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत जाहीर केली आहे.
ही घोषणा करताना दीपक केसरकर यांनी मराठा तरूणांना आवाहन केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्येचे पाऊल उचलू नये. स्व:ताचा जीव देऊन काही मिळत नाही. शासनाकडून कावळे यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत दिली जाणार आहेत. तसेच कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
याचबरोबर, कावळे यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबाची ऐकी त्यांच्या दु:खातून बाहेर येण्यास मदत करेल. माझी कळकळीची विनंती आहे. सरकार संवेदनशील आहे. अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. पण काही बाबी कायद्याच्या कसोटीवर उतराव्या लागतात. यात ज्या अडचणी येत आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री स्वत: कामाला लागले आहेत. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण कोणीही विपरित पाऊल उचलू नये, अशी विनंती दीपक केसरकर यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आला. सुनील काळवे हे जालन्यातील अंबड तालुक्याचे रहिवाशी होते. कावळे यांनी त्यांचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे.