चालिया मंदिरात १० लाखाचे दागिने चोरीस
By admin | Published: May 25, 2017 12:11 AM2017-05-25T00:11:16+5:302017-05-25T00:11:16+5:30
सिंधी समाजाचे प्रसिध्द चालिया मंदिरातून १० लाखाचे दाागिने चोरीला गेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : सिंधी समाजाचे प्रसिध्द चालिया मंदिरातून १० लाखाचे दाागिने चोरीला गेले आहेत. साई झुलेलाल मंदिरातील मूर्तीवरील १७ प्रकाराचे सोन्याचे दागिने चोरटयांनी लंपास केले. ऐन घटनेच्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समजते. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील कॅॅम्प नं-५ येथे सिंधी समाजाचे आराध्य दैवत साई झुलेलाल यांचे चालिया मंदिर आहे. सुरक्षेसाठी मंदिर व परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र चोरीच्या घटनेच्या दरम्यान कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले असून चोरीबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत. तसेच मंदिरात सुरक्षारक्षक तैनात आहेत. चोरटयांनी साई झुलेलाल मूर्तीवर भाविकांनी चढवलेले लाखो रूपयाचे दागिने रात्री १ ते ३ च्या दरम्यान लंपास केले. याठिकाणी पोलीस चौकीची मागणी मंदिर विश्वस्तांनी यापूर्वीच केली आहे. मंदिरात सीसीटीव्ही आहेत, पण ते सुरू होते की बंद याबाबत संभ्रम होता.
चालिया मंदिर सकाळी भक्तांसाठी खुले केल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. मंदिराचे विश्वस्त माजी नगरसेवक बच्चो रूपचंदानी यांच्यासह सहकाऱ्यांनी चोरीची माहिती हिललाईन पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे पथकासह मंदिरात दाखल झाले. त्यांनी मंदिराची पाहणी केल्यानंतर विश्वास्तांशी चर्चा केली. यावेळी १७ प्रकारचे विविध दागिने चोरीला गेले असून त्याची अंदाजे किंमत ९ ते १० लाख असल्याचे बोलले जाते.
मंदिर परिसरात चोरीसह छेडछाडीच्या घटनेत वाढ झाल्याचा आरोप विश्वास्तांनी केला आहे. भाजपाचे शहर-जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी, शिवसेना नेते धनजंय बोडारे, पालिका सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, रवी खिलनानी, नगरसेवक सतराम जेसवानी आदींनी मंदिरात धाव घेतली.
चोर मंदिरात गेलाच कसा? : मंदिराचे मुख्य प्रवेशद्बार बंद असून तेथे सुरक्षारक्षक तैनात असतात. तसेच अनेक गरीब, गरजू व भिकारी झोपलेले असतात. मंदिराचे आतील प्रवेशद्बार रात्री बंद केले जाते. तसेच साई झुलेलाल यांची मूर्ती काचेच्या खोलीमध्ये आहे. काचेच्या खोलीत जाण्यासाठी दरवाजा असून त्याला कुलूप लावले जाते. अशा ठिकाणी चोर जाणे अशक्य आहे. पोलिसांच्या मते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर बंद झाला आहे. मात्र सीसीटीव्ही घटनेच्या वेळी बंद असल्याचे समजते. या प्रकाराने पोलीस चक्रावून गेले आहेत.