धुळ्यातील १० प्रतिष्ठितांना अश्लील मेसेज
By admin | Published: March 4, 2017 05:47 AM2017-03-04T05:47:43+5:302017-03-04T05:47:43+5:30
जळगावच्या दीपककुमार गुप्ता (४०) याने धुळे येथील १० ते ११ प्रतिष्ठित व्यक्तींनाही धमकीचे मेसेज केल्याची माहिती समोर येत आहे
मुंबई : धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई आणि नवी मुंबई येथील आमदारांना अश्लील मेसेज करणाऱ्या जळगावच्या दीपककुमार गुप्ता (४०) याने धुळे येथील १० ते ११ प्रतिष्ठित व्यक्तींनाही धमकीचे मेसेज केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्याकडे या प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह नवी मुंबईच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांना आलेल्या धमकी आणि अश्लील मेसेजप्रकरणी गुप्ताला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मूळचा जळगाव येथील रहिवासी असलेल्या गुप्ता याने तेथील प्रशासकीय यंत्रणेला टार्गेट केले होते. माहिती अधिकाराच्या मदतीने विविध प्रकरणे उकरून काढायची. त्यानंतर संबंधितांबाबत वरिष्ठांपर्यंत तक्रार करून त्यांचा मानसिक छळ करण्याचा धडाका त्याने लावला होता. २०१५ मध्ये धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांच्याबरोबर त्याने आमदार कुणाल पाटील यांनाही अश्लील मेसेज करत धमकावले होते. दोघांच्याही प्रकरणात गुप्ताला अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याने दारूच्या नशेत हा प्रताप केल्याचे समोर आले होते.
अनिल गोटे आणि कुणाल पाटील यांच्या धमकीप्रकरणी दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले असून ते न्यायप्रविष्ट असल्याची माहिती जळगावचे उपअधीक्षक हिम्मत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
मुळात त्याच वेळी गुप्ता याने धुळ्यातील आणखीन १० ते ११ प्रतिष्ठित व्यक्तींना अशा प्रकारे अश्लील मेसेज केले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र त्या वेळी तक्रारदार मंडळी पुढे येण्यास तयार झाल्या नाहीत. त्यामुळे गुप्तावर कारवाई करण्यास अडचण निर्माण झाली. जळगावात त्याच्या अनेक प्रतापांमुळे तो चर्चेत होता. दारूच्या अड्ड्यावर सहा रुपये जास्त घेतले म्हणून त्याने चक्क वैध मापन शास्त्र विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर माहिती अधिकारातील पाठपुराव्यामुळे ते दुकान बंद पाडले होते.
धुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हादेखील त्याने पोलिसांना तपासात सहकार्य केले नव्हते. तेव्हाही त्याच्या विक्षिप्तपणामुळे जळगाव पोलिसांसह तेथील प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढली होती.
त्यानंतर काही दिवस तो शांत झाला. मात्र माहिती अधिकारातून प्रशासकीय यंत्रणेत गोंधळ घालण्याचे काम सुरू होते. मुंबई पोलिसांनाही तो तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहेत. त्याच्या मोबाइल तपशिलाकडे पोलिसांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातून गुप्ताच्या विक्षिप्तपणाचे गूढ उकलणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
>भाजपा महिला नेत्याला धमकीचा मेसेज
मुंबईत आमदारांचे अश्लील मेसेज येण्याचे प्रकरण गाजत असताना, भाजपाच्या एका महिला नेत्यालाही अश्लील मेसेज आल्याने पोलिसांच्या गोंधळात भर पडली. त्यांना मेसेज करणारी व्यक्ती उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच आरोपीच्या शोधासाठी तपास पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले आहेत. यामागेही गुप्ताचा सहभाग आहे का? या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.