१० लाखांवर विद्यार्थी अद्याप आधार लिंकविना!
By admin | Published: April 20, 2017 12:49 AM2017-04-20T00:49:42+5:302017-04-20T00:49:42+5:30
अमरावती विभागातील स्थिती : आधार क्रमांक अपलोड करण्यास तांत्रिक अडचणी
अकोला : शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शासकीय योजना, शिक्षण विभागाच्या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल आॅनलाइन डेटाबेसवर अपलोड करण्यात येत आहेत; परंतु गत चार महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड होत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील ११ हजार ७२७ शाळांमधील १० लाख ३९ हजार विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल आॅनलाइन डेटाबेसवर अपलोडच होत नसल्याची बाब समोर आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय योजना व शैक्षणिक योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येतात. या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी त्यांचे आधार कार्ड क्रमांक शाळेमार्फत सरल आॅनलाइन डेटाबेसवर टाकण्यात येत आहेत. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये ७ लाख ८१ हजार ४२५ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड करण्यात आले; परंतु उर्वरित १० लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकच सरल आॅनलाइन डेटाबेसवर अपलोड नसल्यामुळे शाळांसमोर अडचण निर्माण झाली आहे. अमरावती विभागातील एकूण ११ हजार ७२७ शाळांमधील २२ लाख ९२ हजार ३९४ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड करायचे होते; परंतु डाटाबेसच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड होत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. चार महिने उलटूनही हीच परिस्थिती कायम आहे. यासंदर्भात अनेक शाळांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड करावेत तरी कसे, असा प्रश्न शाळांसमोर उभा राहिला आहे.
सरल आॅनलाइन डेटाबेसवर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड न झाल्यामुळे विद्यार्थी विविध योजनांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.