चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, हसन मुश्रीफांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 07:48 PM2024-07-09T19:48:54+5:302024-07-09T19:49:23+5:30

Hasan Mushrif : काही अध्यापकांची पदे कंत्राटी, मानधनावर भरण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

10 new government medical colleges in the state from the current academic year, Hasan Mushrif announcement | चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, हसन मुश्रीफांची मोठी घोषणा

चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, हसन मुश्रीफांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे  प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० (एमबीबीएस) विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करीता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशीम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ (जिल्हा ठाणे) आणि मुंबई (१० संस्था) येथे १०० (एमबीबीएस) विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वैद्यक परिषद यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले होते, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

त्रुटींची पूर्तता करण्याची कार्यवाही शासन व संचालनालयस्तरावर सुरु आहे. अध्यापकांची पदे भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुरु असून वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नित रुग्णालय या संदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच काही अध्यापकांची पदे कंत्राटी, मानधनावर भरण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

त्रुटी दर्शविलेल्या प्रस्तावित ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकरिता नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वैद्यक परिषद यांच्याकडे शासनामार्फत अपील दाखल करण्यात येणार आहे. या अपिलाच्या सुनावणीस शासनाकडून त्रुटी पूर्ततेसंदर्भातील हमीपत्र सादर करुन या महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या नीट-यूजी-२०२४ ची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे सदर ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करुन घेऊन या शैक्षणिक वर्षी एमबीबीएस प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

Web Title: 10 new government medical colleges in the state from the current academic year, Hasan Mushrif announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.